सोशल मीडिया वापराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सामान्य लोकांपासून ते मोठमोठ्या सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण सोशल मीडियाचा वापर करतात. यामध्ये भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याच्या नावाचाही समावेश आहे. मात्र, रहाणे इतर खेळाडूंप्रमाणे सोशल मीडियावर दररोज पोस्ट शेअर करत नाही. जेव्हाही संधी मिळते, तो त्याच्या चाहत्यांसोबत पोस्ट शेअर करतो. अशात त्याने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे.
अजिंक्य रहाणे व्हिडिओ
अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत रहाणे सोफ्यावर बसल्याचे दिसत आहे आणि इतर दोन व्यक्ती त्याच्या आजूबाजूला नाचत आहेत. तसेच, रहाणेने व्हिडिओवर लिहिले आहे की, “जेव्हा दोन व्यक्ती लॉकर रूममध्ये जल्लोष करत असतात आणि तुम्ही कमी बोलणाऱ्यांपैकी असता.” हा व्हिडिओ शेअर करत रहाणेने कॅप्शनमध्ये लिहिले की, “इंट्रोव्हर्ट लोकांसाठी हा ट्रेंड वाईट स्वप्न आहे.”
https://www.instagram.com/p/CuEp-7jIlwq/
व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स
रहाणेच्या या व्हिडिओवर आतापर्यंत 90 हजारहून अधिक लोकांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे. तसेच, 300हून अधिक कमेंट्सही मिळाल्या आहेत. चाहत्यांनी रहाणेच्या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत. एकाने कमेंट करत लिहिले की, “अरे भावा, हे कोणत्या लाईनमध्ये घुसला तू?” दुसऱ्या एकाने लिहिले की, “खूप आवडलं, तू असे आणखी रील बनवले पाहिजेत.” आणखी एकाने कमेंट केली की, “कमबॅक करावं तर रहाणेसारखं करा, जिंवत तर बुमराहही आहे.” विशेष म्हणजे, त्याची पत्नी राधिका धोपवकर (Radhika Dhopavkar) हिनेही हसण्याचा इमोजी कमेंट केला आहे.
भारताचा वेस्ट इंडिज दौरा
खरं तर, वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी अजिंक्य रहाणे याला भारतीय संघाचा उपकर्णधार म्हणून घोषित केले आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात 12 जुलैपासून कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. उभय संघात 2 कसोटी सामने, 3 वनडे सामने आणि 5 टी20 सामने खेळले जातील. या कसोटी मालिकेतून डब्ल्यूटीसी स्पर्धेच्या तिसऱ्या हंगामाची सुरुवात होईल. यापूर्वी भारतीय संघ दोन्ही हंगामात अंतिम सामन्यात पोहोचून उपविजेता राहिला आहे.
विशेष म्हणजे, रहाणेने डब्ल्यूटीसी 2023 अंतिम सामन्यात भारतीय संघाचा डाव सांभाळण्यात मोलाचा वाटा उचलला होता. संघाची वरची फळी फ्लॉप ठरल्यानंतर त्याने पहिल्या डावात 89 आणि दुसऱ्या डावात 46 धावांची महत्त्वाची खेळी साकारली होती. मात्र, भारतीय संघ विजेतेपद जिंकू शकला नव्हता. (cricketer ajinkya rahane shared his nightmare through instagram post)
महत्वाच्या बातम्या-
रहाणेला पुन्हा उपकर्णधार बनवल्याने गांगुली हैराण! माजी कर्णधारचे मोठे विधान
WI Team Announced : ‘या’ 18 धुरंधरांना घेऊन कसोटी मालिकेत भारताविरुद्ध भिडणार वेस्ट इंडिज