भारतातील सर्वात प्रतिष्ठित क्रिकेट स्पर्धा कोणती? असा प्रश्न विचारल्यावर उत्तर येईल रणजी ट्रॉफी, आणि या रणजी ट्रॉफीतील सर्वात्तम आणि यशस्वी संघ कोणता? या प्रश्नाचे उत्तर येईल मुंबई. एक काळ असा होता की, तुम्हाला भारतीय संघात सहज जागा मिळेल, पण मुंबईच्या संघात जागा मिळणे कठीण होते. विजय मर्चंट, विजय हजारे यांच्यापासून सुरू झालेली स्पेशल क्रिकेटर्सची ही परंपरा आजचे रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे जपत आहेत. या दरम्यानच्या काळात हजारो क्रिकेटर्स मुंबईसाठी येऊन खेळून गेले. काही लक्षात राहिले, तर काही विस्मृतीत गेले. मात्र, मुंबई क्रिकेटने आपला दर्जा अजिबात घसरू दिला नाही.
आजही पृथ्वी शॉ, यशस्वी जयस्वाल, सर्फराज खान, अरमान जाफर हे पंचविशीच्या आतील तरुण मुंबई क्रिकेटची पताका उंचावत आहेत. आता लवकरच यामध्ये एक नवीन नाव सामील होणार आहे किंबहुना सामील झाले आहे. हे नाव आहे मुशीर खान. त्याची सध्याची ओळख म्हणजे सर्फराज खानचा लहान भाऊ.
रणजी ट्रॉफी २०२२ साठीच्या नॉक आउटसाठी पृथ्वी शॉच्या नेतृत्वात मुंबईची टीम घोषित झाली, आणि त्यात नाव दिसले १७ वर्षाच्या मुशीरचे. सरफराज खानचा लहान भाऊ म्हणून त्याची ओळख अनेकांना होती. कारण, त्याने लहान वयातच कारनामेही तसे केले आहेत.
हेही पाहा- Yuvraj Singhच्या दांड्या गुल करणारा Musheer Khan नवा इतिहास लिहायला सज्ज झालाय
क्रिकेट खेळण्यासाठी मुशीरला कोणत्या वेगळ्या इन्स्पिरेशनची गरज पडली नाही. त्याचे वडील नौशाद हेच त्याचे गुरू आणि आदर्श. त्यात भाऊ देशातील सर्वात टॅलेंटेड क्रिकेटर म्हणून ओळखला जाऊ लागल्यावर तर, त्याच्या अंगावर आणखीनच मास चढले. सर्फराजने शेफील्ड शील्ड, कांगा लीग गाजवली. सचिनचा रेकॉर्डही मोडला. मुंबई अंडर नाईन्टीन, इंडिया अंडर नाईन्टीनपर्यंत आला. इकडे मुशीरनेही आपलं करिअर सुरू केलेलं.
सन २०११ ला जाईल्स शिल्ड अंडर १४मध्ये वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी खेळून त्याने कमाल केली. याच्या एक पाऊल पुढे जात, स्पर्धेच्या ६५ वर्षांच्या इतिहासात जे कुणाला जमले नाही ते, सर्वात कमी वयात फाईव्ह विकेट हॉल घेण्याची कामगिरी त्याने केली. दोन वर्षाने तो मुंबईच्या प्रतिष्ठित कांगा लीगमध्ये खेळला. इथेही यंगेस्ट प्लेयरचा रेकॉर्ड त्याच्याच नावे. तोही आपल्याच भावाला मागे टाकून. क्रिकेटचे बायबल म्हटल्या जाणाऱ्या विस्डेनच्या २०१२ एडीशनमध्ये मुशीरचे नाव आले. एवढं सारं असताना मुशीर खऱ्या अर्थानी चर्चेत आला तो, २०१३ च्या एका घटनेने.
युवराज सिंगने मुंबईत आपली क्रिकेट ॲकॅडमी सुरू केली. त्याच्या उद्घाटनावेळी एका प्रदर्शनीय मॅचचे आयोजन केले गेलेले. युवराज आपल्या टीमकडून खेळत होता आणि समोरच्या टीममध्ये होता आठ वर्षाचा मुशीर. डाव्या हाताने स्पिन बॉलिंग करणाऱ्या मुशीरने, तेव्हा चक्क दोन वर्ल्डकपचा हिरो असलेल्या युवराजला क्लीन बोल्ड केले. नेमक त्याच वर्षी विक्रमादित्य सचिन तेंडुलकरने रिटायरमेंट घेतली. त्याने आपली शेवटची मॅच मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळली. या मॅचमध्ये मुशीर बॉल बॉय होता. २०१३च्या कांगा लीगमध्ये अवघ्या आठव्या वर्षी अनेक विक्रम बनवणाऱ्या मुशीरला मुंबई क्रिकेट असोसिएशनने खास सन्मान दिला तोही सचिन तेंडुलकरच्या हातून.
दोन वर्षांनी त्याला आणखी मोठी संधी मिळाली ती देखील, क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्सवर खेळण्याची. दुबईस्थित उद्योगपतीशी श्याम भाटिया यांच्या ‘क्रिकेट फॉर केअर’ या प्रोग्राम अंतर्गत तो पंधरा दिवस इंग्लंड टूरवर गेला. एवढ्या कमी वयात इतके यश मिळालेला तो कदाचित एकटाच असावा.
मुशीर आपल्या टॅलेंटच्या जोरावर मुंबईच्या एज ग्रुप क्रिकेटमध्ये नाव कमावू लागला. २०१९ विजय मर्चंट ट्रॉफीसाठी त्याला अंडर १६ टीमचा कॅप्टनही केलं गेलं. ही टूर्नामेंट त्याने गाजवली. मात्र, विजयाच्या उन्मादात त्याच्याकडून एक गंभीर घटना घडली. जिंकल्यावर आपल्या टीममधील खेळाडूंसमोर पॅन्ट काढून त्याने सेलिब्रेशन केलं. खेळाडूंनी याची तक्रार असोशिएशनकडे केली आणि चौकशीअंती मुशीर गिल्टी ठरला. असोसिएशनने त्याच्यावर सरळ तीन वर्षाचा बॅन लावला. दिलीप वेंगसरकर यांनीही हा बॅन अधिक म्हणत, त्याची शिक्षा कमी करावी यासाठी प्रयत्न केले. शेवटी वडिल नौशाद खान यांनी जिवाचे रान करत हा बॅन ११ महिन्यांवर आणला.
बॅननंतर आलेल्या मुशीरने कायद्यात आणि फायद्यात राहायचं ठरवलं. पोलिस शिल्ड ए डिव्हिजन आणि माधव मंत्री वनडे टूर्नामेंटचा तो मॅन ऑफ द टुर्नामेंट राहिला. कुचबिहार ट्रॉफीच्या फायनलपर्यंत मुंबईला घेऊन जाण्याचे क्रेडिट त्यालाच. ६७० रन्स आणि ३२ विकेट असा त्याचा ऑलराऊंड परफॉर्मन्स राहिला. त्याच्याच जोरावर आता सतराव्या वर्षी तो रणजी टीममध्ये आलाय.
उत्तर प्रदेशवरून मुंबईत येत क्रिकेटर्स घडवणाऱ्या नौशाद खान यांचे स्वप्न आहे की, आपल्या दोन्ही मुलांनी टीम इंडियाची जर्सी घालावी. वडिलांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरफराज आणि मुशीर, अजिबात उशीर करणार नाहीत असेच त्यांच्याकडे पाहून वाटतेय.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चीयरलीडरच्या ‘त्या’ आरोपामुळे आयपीएलची अब्रू चव्हाट्यावर आली
मुंबईची नैय्या पार लावलेला टीम डेव्हिड ऑस्ट्रेलियासाठी दिसू शकतो वर्ल्डकप खेळताना?
स्टार स्टडेड कोची टस्कर्स एकाच सीझननंतर आयपीएलमधून बाहेर का झाली?