भारताचा दिग्गज सलामीवीर शिखर धवननं क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. धवननं शनिवारी (24 ऑगस्ट) सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून चाहत्यांना ही बातमी दिली. शिखर धवननं भारतासाठी 34 कसोटी, 167 एकदिवसीय आणि 68 टी20 सामने खेळले आहेत. निवृत्तीची घोषणा केल्यानंतर आपल्या पहिल्या मुलाखतीत त्यानं निवृत्तीनंतरही लोकांचं प्रेम कमी होणार नसून आणखी वाढू शकतं, असं म्हटलं आहे.
शिखर धवननं ‘हिंदुस्तान टाईम्स’शी खास संवाद साधताना म्हटलं की, त्यानं लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं असून निवृत्तीनंतर तो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसेल. धवनला जेव्हा विचारण्यात आलं की, तो आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणार नाही आणि त्याला मैदानात मिळालेली प्रसिद्धी आणि प्रेम निघून जाईल, त्याबद्दल काय वाटतं? यावर धवन म्हणाला, “नाही, ते जाईल असं मला वाटत नाही. जर मी क्रिकेट सोडलं तर माझी लोकप्रियता कमी होईल, असं गरजेचं नाही. ती वाढू देखील शकते. मी लोकांच्या हृदयात आहे.”
धवन पुढे म्हणाला, “क्रिकेट व्यतिरिक्त मी सोशल मीडिया आणि रील्सद्वारे लोकांना हसवतो आणि यामुळे मला आनंद मिळतो. असे व्हिडिओ बनवणं हा माझा छंद आहे. याद्वारे मी माझ्या चाहत्यांना हसवतो. त्यांना माझ्याशी जोडून ठेवतो. मी अध्यात्माबाबतही वाचतो. त्यात म्हटलं आहे की, तुम्ही जे गमावलं, ते फक्त तुमच्या मनात आहे. तुम्ही रिकाम्या हातानं आले आणि रिकाम्या हातानं जाल.”
38 वर्षीय धवननं 2010 मध्ये विशाखापट्टणम येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटद्वारे आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. तेव्हापासून त्यानं तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. 2013 ते 2019 दरम्यान तो भारताच्या एकदिवसीय संघाचा नियमित सदस्य होता. रोहित शर्मासोबतची त्याची सलामी जोडी खूप हिट ठरली आहे.
हेही वाचा –
आफ्रिदी कुटुंबात नव्या पाहुण्याचं आगमन, शाहिनच्या पत्नीनं दिला बाळाला जन्म
शिखर धवनसारखा मित्र मिळणं दुर्मिळच! या 3 घटनांनी जिंकलंय चाहत्यांचं मन
शिखर धवनच्या निवृत्तीनंतर हे 3 खेळाडूही करू शकतात क्रिकेटला अलविदा