मंगळवारी (दि. 27 जून) वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या विश्वचषकासाठी दोन नवीन संघांची वाट पाहिली जात आहे. यासाठी आयसीसी वनडे विश्वचषक 2023 क्वालिफायर फेरी खेळली जात आहे. सुरुवातीला दहा संघ विश्वचषकातील मुख्य सामने खेळण्यासाठी दावेदार होते, परंतु आता 4 संघ बाहेर पडले आहेत. तसेच, सुपर 6 मध्ये पोहोचलेल्या संघांमध्ये सामने खेळले जात आहेत. सुपर 6 फेरी खेळून विश्वचषकात एन्ट्री करण्यासाठी झिम्बाब्वे, श्रीलंका आणि नेदरलँड संघांची दावेदारी मजबूत मानली जात आहे.
अशात जेव्हा सुपर 6 फेरीत झिम्बाब्वे संघ पुन्हा एकदा मैदानात उतरला, तेव्हा शानदार अष्टपैलू सिकंदर रझा (Sikandar Raza) याने आणखी एक शानदार खेळी करत विक्रम रचला. त्याने त्याच्याच देशाच्या माजी खेळाडूचा 19 वर्षे जुना विक्रम उद्ध्वस्त केला.
वनडेत सिकंदर रझाच्या 4000 धावा
सुपर 6 मधील पहिला सामना झिम्बाब्वे विरुद्ध ओमान (Zimbabwe vs Oman) संघात पार पडला. हा सामना झिम्बाब्वेने 14 धावांनी आपल्या नावावर केला. या सामन्यात झिम्बाब्वेकडून सिकंदर रझा याने 49 चेंडूत 42 धावांची खेळी साकारली. यावेळी तो अर्धशतक करण्यास मुकला, पण वनडे सामन्यात त्याने 4000 धावांचा आकडा पार केला. त्याने या धावांचा टप्पा गाठण्यासाठी 127 डाव खेळले. विशेष म्हणजे, हे डाव वनडेत झिम्बाब्वेकडू 4000 धावा करताना खेळलेले सर्वात कमी डाव आहेत.
रझापूर्वी ग्रँड फ्लॉवर याने 128 डावांमध्ये 4000 धावा करण्याचा विक्रम रचला होता. त्याने 6000 धावा केल्यानंतर 2004 मध्ये निवृत्ती घेतली होती. म्हणजेच, त्याच्यानंतर हा विक्रम कुणीच मोडू शकले नव्हते. मात्र, आता सिकंदर रझा फ्लॉवरच्याही पुढे गेला आहे. याव्यतिरिक्त ब्रेंडन टेलर यानेही 129 डावांमध्ये 4000 धावांचा टप्पा पार केला होता. अँडी फ्लॉपर फ्लॉवर याने 133 डावात आणि सीन विलियम्स याने 135 डावात अशी कामगिरी केली होती.
सिकंदर रझाला आयसीसी क्रमवारीत फायदा
सिकंदर रझाने मागील काही सामन्यांमध्ये शानदार फलंदाजी आणि गोलंदाजी केली होती. त्यामुळे नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसी क्रमवारीत त्याला चांगला फायदा मिळाला होता. तो 282 गुणांसह अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानी आहे. संघ अजून कमीत कमी 2 सुपर 6 सामने खेळेल. जर या सामन्यांमध्ये शानदार प्रदर्शन केले, तरच संघाला आणखी सामने खेळायला मिळू शकतात. विशेष म्हणजे, त्यानंतर संघ विश्वचषकातील मुख्य सामने खेळतानाही दिसू शकतो.
सिकंदर रझा काही महिन्यांपूर्वी आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाकडून खेळत होता. यादरम्यान त्याने 2 वेळा सामनावीर पुरस्कार आपल्या नावावर केला होता. आता आगामी सामन्यांमध्ये रझा आणि झिम्बाब्वे संघ कशी कामगिरी करतात, याकडे सर्वांचे लक्ष असेल. (cricketer sikandar raza becomes the fastest to complete 4000 runs in terms of innings zim vs oman)
महत्वाच्या बातम्या-
‘मी दिनेश कार्तिकला मनात नाही तसलं बोललो…’, भारत-पाक सामन्याबाबत अश्विनचा धक्कादायक खुलासा
KKRच्या गोलंदाजाचा दुलीप ट्रॉफीत राडा, अवघ्या 75 चेंडूत ठोकलं वादळी शतक; कोण आहे तो?