भारत देशात क्रिकेटला एक वेगळाच दर्जा प्राप्त आहे. भारतात कनिष्ठ स्तरापासून वरिष्ठ स्तरापर्यंत लाखो क्रिकेटपटू देशाचे नेतृत्व करण्याचे स्वप्न पाहत असतात. मात्र, सर्वांचे स्वप्न पूर्ण होत नाही. जवळपास ९० वर्षाच्या भारतीय क्रिकेटच्या इतिहासात केवळ ३०२ खेळाडूंना कसोटी खेळण्याची संधी मिळाली आहे. तसेच, १९७४ पासून फक्त २३४ क्रिकेटपटू भारतासाठी वनडे खेळले आहेत.
देशांतर्गत क्रिकेट तसेच वयोगट क्रिकेटमध्ये लक्षणीय कामगिरी करूनही अनेक प्रतिभावंत क्रिकेटपटू भारताचे प्रतिनिधित्व करण्यापासून वंचित राहिले. यापैकीच एक खेळाडू २०१२ एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य होता, ज्याला भारतीय क्रिकेटमध्ये दिग्गज भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज एमएस धोनीचा वारसदार म्हटले जात होते. मात्र आता हाच क्रिकेटपटू आपला देश सोडून अमेरिकेकडून आंतरराष्ट्रीय खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. हा खेळाडू स्मित पटेल होय. आपल्या भविष्यातील कारकिर्दीसाठी त्याने अमेरिकेसाठी खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
विश्वचषक विजेत्या संघाचा होता सदस्य
भारताच्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट संघांने २०१२ मध्ये ऑस्ट्रेलिया येथे झालेला क्रिकेट विश्वचषक आपल्या नावे केला होता. या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय कर्णधार उन्मुक्त चंदसोबत नाबाद १३० धावांची भागीदारी करून भारताला विश्वचषक मिळवून देण्यात स्मित पटेलचा मोलाचा वाटा होता. या डावात त्याने ६२ धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केलेली. या खेळीनंतर त्याचे भरभरून कौतुक झाले होते.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये केले विविध संघांचे प्रतिनिधित्व
विश्वचषकातील उत्कृष्ट कामगिरीनंतर त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये काही उत्तम खेळ्या केल्या. मात्र, तो कामगिरीत सातत्य राखू शकला नाही. परिणामी, आपले गृह राज्य असलेल्या गुजरात व्यतिरिक्त त्याने बडोदा, गोवा व त्रिपुरा या राज्यांचे देखील रणजी ट्रॉफीमध्ये प्रतिनिधित्व केले. त्याने आपल्या प्रथमश्रेणी कारकिर्दीत ५५ सामने खेळताना ३९.४९ च्या उत्कृष्ट सरासरीने ३२७८ धावादेखील फटकावल्या. यामध्ये त्याने ११ शतके व १८ अर्धशतके तसेच, एक द्विशतकदेखील साजरे केले आहे. लिस्ट ए व टी२० मध्ये त्याची कामगिरी समाधानकारक नाही राहिली. याच कारणाने आयपीएलसारख्या जगविख्यात स्पर्धेत तो खेळताना दिसला नाही.
आता करणार अमेरिकेचे प्रतिनिधित्व
भारतात म्हणावी तशी संधी न मिळाल्याने स्मितने आता अमेरिकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. त्याचे कुटुंबीय २०१० पासूनच अमेरिकेतील पेनिसेल्विया या ठिकाणी स्थायिक झाले असून, त्याला देखील ग्रीन कार्ड मिळाले आहे. ज्या आधारे तो आता अमेरिकेचा नागरिक बनू शकतो. त्याला अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले असले तरी, तो नियमानुसार अमेरिकेसाठी ऑगस्ट २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहे.
अमेरिकेकडून खेळण्यासाठी स्मितने सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. नियमानुसार दुसऱ्या देशासाठी खेळण्याआधी भारतीय खेळाडूंना आपण निवृत्त होत असल्याचे सांगावे लागते. स्मितने मागील महिन्यातच निवृत्त होत असल्याचे सांगितलेले. त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्याला ना हरकत प्रमाणपत्र दिले होते.
कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये घेणार सहभाग
बीसीसीआयने ना हरकत प्रमाणपत्र दिल्याने स्मितचा जगभरातील टी२० लीगमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कॅरेबियन प्रीमियर लीगच्या (सीपीएल) आगामी हंगामात तो जेसन होल्डरच्या नेतृत्वात बार्बाडोस ट्राइडेंट संघात खेळताना दिसेल. प्रवीण तांबे नंतर ही स्पर्धा खेळणारा तो दुसरा भारतीय ठरेल.
भारतासाठी खेळण्याचे स्वप्न अपुरे राहिले
या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया देताना स्मित म्हणाला, “भारतासाठी खेळण्याचे माझे स्वप्न अपुरे राहिले. मात्र, आयुष्यात पुढे येणाऱ्या गोष्टींचे स्वागत केले पाहिजे. भारतात यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून खूप मोठी स्पर्धा आहे. धोनी माझा कायम आदर्श खेळाडू राहिला. सचिन तेंडुलकरची फलंदाजी पाहून मी मोठा झालो. सध्या विराट कोहली उत्कृष्ट खेळाडू वाटतो. आयपीएलमध्ये अनेक संघांनी नेहमी माझ्याशी संपर्क साधला. अनेकदा मला लिलावात शॉर्टलिस्ट देखील केले गेले. मात्र, संधी मिळाली नाही. आता, सीपीएलमध्ये खेळण्याचा अनुभव शानदार असेल, अशी आशा करतो.”
तब्बल आठ वर्ष प्रतीक्षा करूनही भारतीय संघात स्थान मिळाले नसल्याने हा निर्णय घेतल्याचे त्याने जड अंतकरणाने सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंड-न्यूझीलंड कसोटीचा दर्शकांनी लुटला भरपूर आनंद, ‘बियर स्नेक’चा व्हिडिओ भन्नाट व्हायरल
‘घरी नको जायला, खूप मार पडेल’; युवीने सांगितला २००७ विश्वचषकानंतरचा तो किस्सा