---Advertisement---

क्रिकेटचं काय घेऊन बसलाय! या ५ क्रिकेटर्सने गाजवलेत दुसरेही खेळ

On: बुधवार, जून 24, 2020 11:22 AM
---Advertisement---

साधारणत: असे पाहायला मिळते की, एखादा खेळाडू हा एका खेळात तरबेज असतो आणि त्या खेळातच आपली कारकिर्द घडवतो. पण, असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी एका खेळासह अन्य दुसऱ्या खेळांमध्येही महारथ मिळवला आहे. क्रिकेट जगतातही असे अनेक क्रिकेटपटू आहेत जे क्रिकेटच्या दुनियेत बादशहा तर आहेतच, पण त्यांनी इतर खेळातही आपले आपले नाव गाजवले आहे.

बघूयात त्या पाच क्रिकेटपटूंच्या इतर खेळातील कारकिर्दीविषयी  Cricketers who have played other sports before cricket

एबी डिविलियर्स –

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिविलियर्स हा क्रिकेट जगतात खूप प्रसिद्ध आहे. तो फक्त शानदार फलंदाज नाही. तर, उत्कृष्ट बॅडमिंटन, हॉकी आणि टेबल टेनिसपटू आहे.  २०१६साली डिविलियर्सने एका मुलाखतीत सांगितले होते की, तो त्याच्या विद्यालयीन वयात तो हॉकीपटू खेळत असे. असे असले तरी तो हॉकीमध्ये जास्त पारंगत नव्हता.

त्यामुळे त्याला राष्ट्रीय हॉकी संघाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. पण तो विद्यालयीन हॉकी संघाचा भाग होता आणि चांगल्याप्रकारे खेळलाही होता. मात्र, पुढे त्याने हॉकी सोडले आणि क्रिकेटमध्ये आपली कारकिर्द घडवली.

जॉन्टी रोड्स –

जॉन्टी रोड्स हा दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा दमदार खेळाडू होता. तो उत्कृष्ट क्षेत्ररक्षक होता. क्रिकेटव्यतिरिक्त त्याने हॉकीसुद्धा खेळले आहे. त्याची १९९२साली दक्षिण आफ्रिकेच्या हॉकी ऑलिम्पिक संघात निवड झाली होती. मात्र, त्यांचा संघ पात्र ठरू शकला नाही आणि ते ऑलिम्पिकमधून बाहेर पडले. पुढे त्याने १९९६मध्ये हॉकी ऑलिम्पिक संघासाठी चाचणी दिली होती, पण हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे त्याला संघातून वगळण्यात आले होते.

ब्रेंडन मॅक्कुलम –

न्यूझीलंड संघाचा माजी क्रिकेटपटू ब्रेंडन मॅक्कुलम हा संघाचा यष्टीरक्षक फलंदाज होता. मात्र, तो त्याच्या कुमारवयात चांगला रग्बी खेळाडूही होता. अनेक वृत्तांनुसार त्यावेळी मॅक्कुलम हा राष्ट्रीय रग्बी संघामध्ये स्थान मिळवू शकला असता. पण, त्याने क्रिकेटला अधिक प्राधान्य दिल्याने ते शक्य झाले नाही.

एलिसा पेरी –

ऑस्ट्रेलिया महिला संघाची अष्टपैलू क्रिकेटपटू एलिसा पेरी हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑस्ट्रेलिया महिला फुटबॉल संघाचे प्रतिनिधित्त्व केले आहे. एलिसा महिला फुटबॉल क्लब युनायटेड आणि सिडनी एफसी संघाकडून खेळली आहे. ती अशी खेळाडू आहे, जिने फुटबॉल आणि क्रिकेट दोन्हीमध्ये ऑस्ट्रेलिया संघाचे विश्वचषकात प्रतिनिधित्त्व केले आहे.
सूजी बेट्स – 

सूजी बेट्स न्यूझीलंड महिला संघाची कर्णधार आणि अष्टपैलू क्रिकेटपटूही आहे. याशिवाय ती एक चांगली बास्केटबॉलपटूही आहे. तिने न्यूझीलंड राष्ट्रीय बास्केटबॉल संघाचे प्रतिनिधित्तव केले आहे. परंतु, तिच्या छोट्याशा बास्केटबॉल कारकिर्दीला जास्त प्राधान्य न देता तिने क्रिकेट क्षेत्र निवडले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---