भारताने श्रीलंकेला कोलंबो येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेला पराभूत करून मालिका खिशात घातली. कर्णधार विराट कोहली सामान्यनंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाला खेळाडूंबद्दल आणि संघाच्या आगामी दौऱ्या बद्दल नक्कीच सकारात्मक आहे.
“२०१५ मध्येही आम्ही श्रीलंकेत मालिका जिंकलो होतो आणि आता पुन्हा येथे मालिका विजय मिळवून आम्ही खूप खुश आहोत. घरच्या मैदानावर खेळणे किंवा परदेशी खेळणे असो, आता आम्हाला या गोष्टीचा फरक पडत नाही. प्रत्येक कसोटी सामना आम्ही जिंकण्यासाठी खेळतो आणि आम्हला आत्मविश्वास आहे की आम्ही जिंकू शकतो.” भारतीय कर्णधार विराट कोहली म्हणाला.
भारताने या मालिकेत निर्विवाद वर्चस्व राखले आहे. तिनही विभागात भारताने श्रीलंकेला पछाडले आहे. पहिल्या सामन्याप्रमाणेच भारताने उत्कृष्ट फलंदाजी करून ६२२ धावांचा डोंगर रचला. भारताच्या चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य राहणे यांनी शतकी खेळी केली, तर कमबॅक सामन्यात के एल राहुलनेही अर्धशतक लगावले. फलंदाजीच्या खालच्या फलीत सहा, अश्विन आणि जडेजा यांनी अर्धशतक लगावले. या डावात फक्त उमेश यादव हा एकमेव फलंदाज होता ज्याने दोनअंकी धाव संख्या केली नाही. श्रीलंकेच्या बाजूने विचार करायचे झाले तर रंगणा हेराथने ४ विकेट्स घेतल्या ही एकमेव चांगली गोष्ट झाली.
त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या श्रीलंकन फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी सळो की पळो करून सोडले. त्यांचा एकही फलंदाज टिकू शकला नाही. श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात फक्त १८३ धावा करू शकला, आणि त्याना फॉलो ऑनची नामुष्की ही टाळता आली नाही. भारताकडून अश्विनने ५ तर जडेजा आणि शमीने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. त्यानंतर विराट कोहलीने श्रीलंकेला पुन्हा फलंदाजी करण्यास आमंत्रित केले.
दुसऱ्या डावात फलंदाजी करताना श्रीलंकेच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मेंडिस आणि करुणारत्ने यांनी शतक लगावले. सामन्यात एकाठिकाणी तर असे वाट होते की श्रीलंका भारताला १००-१५० धावांचे लक्ष देईल पण हे दोघे बाद झाल्यानंतर नियमित काळाने भारताने श्रीलंकेला धक्के दिले आणि ३८६ वर श्रीलंकेच्या सर्व विकेट्स घेतल्या. भारताने हा सामना एक डाव आणि ५३ धावांनी जिंकला आणि या विजयाचा शिल्पकार ठरला रवींद्र जडेजा ज्याने श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात ५ विकेट्स घेतल्या.