इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेसाठी मागील वर्षी म्हणजेच डिसेंबर 2022मध्ये मिनी लिलाव पार पडला. या लिलावात चेन्नई सुपर किंग्स संघाने इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स याला तब्बल 16.25 कोटी रुपये खर्चून आपल्या ताफ्यात सामील केले होते. मात्र, आता सीएसके संघासाठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. स्टोक्स आयपीएल 2023 स्पर्धेच्या इतर सामन्यांमध्ये खेळताना दिसणार नाहीये. यामुळे आता चेन्नईचे 16.25 कोटी पाण्यात गेल्याचे चाहते म्हणत आहेत.
खरं तर, सीएसके (CSK) संघाच्या अखेरच्या साखळी सामन्यानंतर बेन स्टोक्स (Ben Stokes) मायदेशी परतणार आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, स्टोक्स शनिवारी (दि. 20 मे) दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यानंतर इंग्लंडला परतेल, जिथे तो ऍशेस मालिकेसाठी तयारी करेल.
बेन स्टोक्सने खेळले फक्त दोन सामने
विशेष म्हणजे, बेन स्टोक्स याने आयपीएल 2023 स्पर्धेत आतापर्यंत फक्त 2 सामने खेळले आहेत. हे सामनेदेखील त्याने स्पर्धेच्या सुरुवातीलाच खेळले होते. सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात त्याने अनुक्रमे 7 आणि 8 धावा केल्या होत्या. तसेच, त्याने फक्त 1 षटक गोलंदाजी करताना 18 धावाही खर्च केल्या होत्या. त्याने कोणतीही विकेट घेतली नव्हती. पहिले दोन सामने खेळल्यानंतर स्टोक्सच्या पायाच्या बोटाला दुखापत झाली आणि डावा गुडघाही दुखापतग्रस्त असल्याचे दिसले. मात्र, स्टोक्स सध्या फिट आहे.
आधी 1 जूनला जाणार होता स्टोक्स
माध्यमांतील वृत्तांनुसार, बेन स्टोक्स 20 मे रोजी दिल्लीविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या अखेरच्या साखळी सामन्यानंतर इंग्लंडला परतेल. मात्र, त्याआधी असे म्हटले जात होते की स्टोक्स 1 जून रोजी लॉर्ड्सला परतेल, जिथे तो आयर्लंडविरुद्ध एकमेव कसोटी सामन्याचा भाग असेल. मात्र, आता ऍशेस मालिकेच्या तयारीसाठी स्टोक्स 10 दिवस आधीच आयपीएल मध्येच सोडून मायदेशी परतणार आहे.
स्टोक्सच्या दुखापतीवर काय म्हणाले फ्लेमिंग?
बेन स्टोक्स याच्या दुखापतीबाबत मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनीही नुकतेच म्हटले होते की, स्टोक्स सध्या फिट आहे. मात्र, प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याची जागा पक्की होऊ शकत नाहीये. यामागील कारण संघात खेळत असलेल्या खेळाडूंचे चांगले प्रदर्शन आहे. चेन्नई सध्या डेवॉन कॉनवे, मोईन अली, मथीशा पथिराना आणि महीश थीक्षणा या चार विदेशी खेळाडूंसोबत खेळत आहे. ते चौघेही चांगली कामगिरी करत आहेत. फ्लेमिंग यांनी याचे संकेत दिले होते की, स्टोक्स दिल्लीविरुद्धच्या सामन्यातही खेळणार नाही. (csk all rounder ben stokes will miss ipl playoffs match read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गुजरातचं कंबरडं मोडत भुवीने रचला इतिहास! IPLमध्ये एकदा नाही, तर दुसऱ्यांदा केली जबरदस्त कामगिरी
‘आशिया चषक आमच्याशिवाय झाला, तर आम्ही एकाच वेळी…’ PCB प्रमुखाची भारताला चेतावणी