मुंबई । 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरू होणार्या आयपीएलसाठी संघांना तयारीसाठी फारच कमी वेळ शिल्लक आहे. अशा परिस्थितीत चेन्नई सुपर किंग्जने आपल्या संघाला होम ग्राऊंड एम चिदंबरम स्टेडियमवर सराव करण्याची परवानगी मिळविली आहे.
तामिळनाडू सरकारने संघास 15 ऑगस्टपासून चेन्नई येथे कॅम्प भरवण्याची परवानगी दिली आहे. 21 ऑगस्टला युएईला रवाना होण्यापूर्वी एमएस धोनी, सुरेश रैना, हरभजन सिंग आणि अंबाती रायुडूसारखे खेळाडू सहभागी होतील.
चेन्नई व्यतिरिक्त फक्त मुंबई इंडियन्स संघाने आपल्या सर्व खेळाडूंना सराव शिबिर आयोजित करण्यासाठी परवानगी घेतली. या दोन संघांव्यतिरिक्त इतर कोणत्याही संघास अद्यापपर्यंत शिबीर आयोजित करण्यात यश आले नाही.
माध्यमांतील वृत्तांनुसार, चेन्नई येथे होणार्या शिबिरातील खेळाडूंना हॉटेल व मैदानाबाहेर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्याच वेळी त्यांची दोनदा कोरोना चाचणी घेण्यात येईल. खेळाडूंचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच ते यूएईला जाऊ शकतील.
परदेशी प्रशिक्षकाच्या अनुपस्थितीत, चेन्नई येथे राहणारे संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक एल बालाजी हे या शिबिराचे प्रमुख असतील. लॉकडाउन होण्यापूर्वी, जेव्हा सीएसकेचे शिबिर अायोजीत केले, तेव्हा तेथे मोठ्या संख्येने चाहते उपस्थित होते, परंतु आता तसे होणार नाही. चाहत्यांना स्टेडियम किंवा हॉटेलजवळ न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.