आयपीएलच्या 12 व्या मोसमाची सुरुवात शनिवार, 23 मार्चपासून होणार आहे. या मोसमातील पहिला सामना हा गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात एमए चिदंबरम स्टेडियम(चेपॉक), चेन्नई येथे होणार आहे.
चेन्नईच्या संघाने दोन वर्षांच्या बंदीनंतर मागीलवर्षी आयपीएलमध्ये जबरदस्त पुनरागमन करताना विजेतेपदही जिंकले होते. त्यांनी अंतिम सामन्यात सनरायझर्स हैद्राबाद संघाला पराभूत केले होते. हे त्यांचे तिसरे विजेतेपद आहे.
विशेष म्हणजे मागील मोसमात वयस्कर खेळाडूंचा संघ म्हणून सुरुवातीला चर्चा झालेल्या चेन्नई संघाने शेवटपर्यंत चमकदार कामगिरी करत विजेतेपद मिळवत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यामुळे मागीलवर्षी प्रमाणेच अशी अफलातून कामगिरी करण्यास चेन्नई सुपर किंग्ज यावर्षी उत्सुक असेल.
या मोसमात चेन्नई सुपर किंग्जच्या या खेळाडूंची कामगिरी ठरु शकते महत्त्वाची-
5. एमएस धोनी –
आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व केलेल्या एमएस धोनीची कामगिरी यावर्षी आयपीएलमध्ये महत्त्वाची ठरणार आहे. त्याचा यावर्षीचा फॉर्मही चांगला आहे. त्याने यावर्षात आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4 अर्धशतकी खेळीही केल्या आहेत. तसेच मागीलवर्षी त्याने आयपीएलमध्ये चांगला खेळ केला होता.
त्याने 11 व्या आयपीएल मोसमात 18 सामन्यात 3 अर्धशतकांसह 75.83 च्या सरासरीने 455 धावा केल्या होत्या. त्यामुळे यावर्षीही त्याच्याकडून अशाच खेळाची अपेक्षा असेल. त्याचबरोबर त्याची यष्टीरक्षणाची कामगिरीही चेन्नईसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
4. सुरेश रैना –
मिस्टर आयपीएल अशी ओळख असणाऱ्या रैनाने आत्तापर्यंत नेहमीच आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. तसेच त्याने नुकत्याच पार पडलेल्या सईद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीमध्येही उत्तरप्रदेशकडून खेळताना हैद्राबाद विरुद्ध तुफानी फलंदाजी करत अर्धशतकी खेळी केली होती.
मात्र अन्य सामन्यात त्याला खास काही करता आले नव्हते. पण तरीही रैनाची कामगिरी चेन्नईसाठी मोलाची ठरणार आहे. त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये कोणत्याही मोसमात 300 पेक्षा कमी धावा केलेल्या नाही. त्यामुळे त्याचा हा विक्रम कायम राहतो का हे देखील पाहणे यावेळी उत्सुकतेचे ठरणार आहे.
3. रविंद्र जडेजा –
रविंद्र जडेजासाठी हा आयपीएलचा मोसम महत्त्वाचा ठरणार आहे. कारण आयपीएलनंतर लगेचच विश्वचषक होणार असल्याने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्यास जडेजाला विश्वचषकासाठी भारतीय संघात संधी मिळू शकते.
त्याचबरोबर जडेजाने नेहमीच खेळताना गोलंदाजी बरोबरच फलंंदाजी आणि विशेषत: क्षेत्ररक्षणात जबरदस्त कामगिरी केली आहे. चेन्नई संघासाठी जडेजाची अष्टपैलू कामगिरी कायमच उल्लेखनीय झाली आहे. त्यामुळे यावर्षी जडेजा काय कमाल करतो हे पाहणे देखील उत्सुकतेचे आहे.
2. फाफ डु प्लेसीस –
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार असलेला डुप्लेसीस यावर्षी पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जकडून खेळण्यास सज्ज झाला आहे. त्याने मागीलवर्षी 6 सामने खेळले होते. या सहा सामन्यात त्याने चांगली कामगिरी केली होती. त्याने 32.40 च्या सरासरीने 162 धावा केल्या होत्या.
विशेष म्हणजे त्याने बाद फेरीत सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध अर्धशतकी खेळी करत चेन्नईला अंतिम फेरीत पोहचवले होते. त्या सामन्यात त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला होता.
त्याचबरोबर डुप्लेसीस यावर्षी चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने यावर्षात आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 सामन्यात 69.33 च्या सरासरीने 832 धावा केल्या आहेत. यात त्याने 2 शतके आणि 6 अर्धशतके केली आहेत. त्यामुळे डुप्लेसीसकडूनही चेन्नई संघाला अपेक्षा असतील.
1. शेन वॉटसन –
चेन्नई सुपर किंग्जला मागीलवर्षी विजेतेपद जिंकून देण्यात शेन वॉटसनचा मोठा वाटा होता. त्याने अंतिम सामन्यात शतकी खेळी करत चेन्नईला हे विजेतेपद मिळवून दिले होते. तसेच मागील मोसमात वॉटसनचा अष्टपैलू खेळ चेन्नईसाठी चांगलाच फायदेशीर ठरला होता.
त्याचबरोबर वॉटसनने पाकिस्तान सुपर लीगमध्येही(पीएसएल) यावर्षी चांगली कामगिरी केली आहे. त्याला पीएसएलच्या या मोसमाचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही देण्यात आला. त्याने 43 च्या सरासरीने 430 धावा केल्या आहेत.
तसेच वॉटसनने मागीलवर्षी आयपीएलमध्येही 15 सामन्यात 39.67 च्या सरासरीने 555 धावा केल्या होत्या. मागीलवर्षीच्या मोसमात तो सर्वाधिक धावा करणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये 5 व्या क्रमांकावर होता. त्यामुळे चेन्नईकडून यावर्षीही अशीच कामगिरी करण्यास वॉटसन उत्सुक असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
–आयपीएल इतिहासातील हे आहेत ५ मोठे वाद, ज्यामुळे आयपीएलच नाव झालं खराब
–चौथ्या क्रमांकावर विश्वचषकात खेळणार हा खेळाडू
–जेमतेम ३ दिवस राहिलेल्या आयपीएलमधील संघांचे असे आहेत खेळाडू