दुबई। रविवारी(१० ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील अंतिम सामन्यात प्रवेश केला. त्यांनी क्वालिफायर १ सामन्यात गुणतालिकेतील अव्वल क्रमांचा संघ दिल्ली कॅपिटल्सचा ४ विकेट्सने पराभव करत तब्बल नवव्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्याचा मान मिळवला. चेन्नईने विजय मिळवताच संघातील खेळाडूंनी आणि स्टेडियममध्ये चेन्नईला प्रोत्साहन देण्यासाठी आलेल्या चाहत्यांनी मोठा जल्लोष केला.
या सामन्यात चेन्नईला विजयासाठी ३ चेंडूत ४ धावांची गरज असताना धोनीने चौकार मारत चेन्नईला विक्रमी नवव्यांदा अंतिम सामन्यात स्थान मिळवून दिले. धोनीने विजयी चौकार मारताच स्टेडियममध्ये सीएसकेच्या नावाने एकच जल्लोष झाला. या जल्लोषाच्या काही क्षणांचा व्हिडिओ आयपीएलच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडिओमध्ये दिसते की धोनीने चौकार मारल्यानंतर नॉन-स्ट्रायकरला असलेला रविंद्र जडेजा पळत येऊन धोनीला मिठी मारतो. तर, धोनीची पत्नी साक्षीही स्टँडमध्ये भावूक झाल्याचे दिसते. तसेच चेन्नई संघातील खेळाडूही एकमेकांना भेटून एकमेकांचे अभिनंदन करत आहेत. याबरोबरत अंतिम सामन्यात पोहचल्याबद्दल आनंद व्यक्त करत आहेत.
एवढेच नाही तर, स्टेडियममध्ये सामना पाहाण्यासाठी आलेले चाहतेही नाचून आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की ‘काय मस्त क्रिकेट सामना होता. चेन्नईने शुक्रवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.’
What a game of cricket that was! #CSK, they are now in Friday's Final of #VIVOIPL pic.twitter.com/eiDV9Bwjm8
— IndianPremierLeague (@IPL) October 10, 2021
चेन्नईचा रोमांचक विजय
या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण, दिल्लीकडून पृथ्वी शॉ आणि रिषभ पंतने अर्धशतकं करत दिल्लीला मोठी धावसंख्या उभारुन देण्यात हातभार लावला. तसेच पंतबरोबर शिमरॉन हेटमायरने केलेली ८३ धावांची भागीदारीही महत्त्वाची ठरली.
शॉने ३४ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ६० धावा केल्या. तसेच पंतने ३५ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ५१ धावा केल्या. तर हेटमायरने ३७ धावा केल्या. त्यामुळे दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १७२ धावा केल्या होत्या. चेन्नईकडून जोश हेजलवूडने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या चेन्नईकडून फाफ डू प्लेसिस १ धावेवर बाद झाल्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि रॉबिन उथप्पाने डाव सांभाळत चेन्नईला भक्कम स्थितीत उभे केले. या दोघांनी ११० धावांची भागीदारी करताना वैयक्तिक अर्धशतकंही केली. उथप्पाने ४४ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ६३ धावा केल्या. तर, ऋतुराजने ५० चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ७० धावांची खेळी केली.
पण, उथप्पा १४ व्या, तर ऋतुराज १९ व्या षटकात बाद झाला. आणि चेन्नईने मधल्या काही षटकांत महत्त्वाच्या विकेट्सही गमावल्या होत्या. त्यामुळे अखेरीस चेन्नई संघ संकटात सापडला होता. चेन्नईला अखेरच्या षटकात १३ धावांची गरज होती. पण, यावेळी कर्णधार एमएस धोनीने त्याच्या जुन्या अंदाजात फलंदाजी केली आणि तीन चौकारांसह चेन्नईला विजय मिळवून दिला.
धोनी ६ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकारासह १८ धावांवर नाबाद राहिला. तर मोईन अलीनेही १६ धावांची पण महत्त्वपूर्ण छोटेखानी खेळी केली. चेन्नईने १९.४ षटकांत १७३ धावा पूर्ण करुन सामना जिंकला.
चेन्नई अंतिम सामन्यात
चेन्नई संघ आता अंतिम सामन्यात पोहोचला आहे. अंतिम सामना शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) आता सोमवारी (११ ऑक्टोबर) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात एलिमिनेटर सामना होणार आहे. यातील जो संघ सामना जिंकेल, तो मंगळवारी (१२ ऑक्टोबर) होणाऱ्या क्वालिफायर २ सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना करेल. त्यातून जो संघ विजयी होईल, तो अंतिम सामन्यात चेन्नई विरुद्ध खेळले.
महत्त्वाच्या बातम्या –
विजय एक विक्रम अनेक! दिल्लीवरील विजयानंतर धोनीच्या नावावर ‘या’ विक्रमांची नोंद
ती बघ उडाली! रिषभने जोरदार फटका खेळताच बॅट निसटून गेली हवेत; गिरक्या घेत आदळली जमिनीवर