इंडियन प्रीमियर लीग २०२२ (आयपीएल २०२२) चा हंगाम सुरू होण्यासाठी अवघे २ दिवस बाकी असताना चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी याने मोठी घोषणा केली आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्जचे (सीएसके) नेतृत्त्वपद सोडत ही जबाबदारी अनुभवी अष्टपैलू रविंद्र जडेजा याच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. जडेजा २६ मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सीएसकेचा कर्णधार म्हणून पहिला सामना खेळेल.
आयपीएलच्या ४ वेळच्या विजेत्या सीएसके (Chennai Super Kings) संघाचे नेतृत्त्वपद मिळाल्यानंतर जडेजाने पहिली प्रतिक्रिया (Ravindra Jadeja’s First Reaction) दिली आहे. सीएसकेने त्यांच्या ट्वीटर अकाउंटवर जडेजाच्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ शेअर केला आहे.
“सीएसकेचे कर्णधारपद मिळाल्यानंतर मला खूप चांगले वाटत आहे. त्याचवेळी मला खूप मोठा वारसा पुढे घेऊन जायचा आहे, याची चिंताही वाटत आहे. माही भाईने (एमएस धोनी) खूप मोठा वारसा ठेवला आहे, आता तो तसाच पुढे नेण्याची जबाबदारी माझ्यावर असेल,” असे जडेजा म्हणाला.
पुढे बोलताना त्याने सांगितले की, “माही भाई सध्या माझ्यासोबत असल्याने मला जास्त काळजी करण्याची गरज नाही. तो नेहमीच अडचणीवेळी माझ्या मदतीसाठी उपलब्ध होता आणि पुढेही असेल, त्यामुळे मी अजिबात चिंतीत नाही. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि प्रेमासाठी धन्यवाद. आम्हाला पाठिंबा देत राहा.”
📹 First reactions from the Man himself!#ThalaivanIrukindran 🦁💛 @imjadeja pic.twitter.com/OqPVIN3utS
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 24, 2022
सीएसकेने अशी दिली धोनीच्या कर्णधारपद सोडण्याची माहिती
तत्पूर्वी धोनीने सीएसकेचे नेतृत्त्वपद सोडल्याची माहिती देताना सीएसकेने म्हटले आहे की, “धोनीने चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्त्वपद दुसऱ्या खेळाडूकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने संघाची कमान सांभाळण्यासाठी जडेजासाठी निवड केली आहे. २०१२ पासून जडेजा सीएसकेचा महत्त्वपूर्ण भाग राहिला आहे. तो सीएसकेचे नेतृत्त्व करणारा केवळ तिसराच खेळाडू बनेल.”
जडेजापूर्वी धोनी आणि सुरेश रैना यांनी सीएसकेचे नेतृत्त्व केले आहे. धोनीच्या अनुपस्थित रैनाला काही सामन्यांमध्ये सीएसकेचे नेतृत्त्वपद सांभाळण्याची संधी मिळाली होती. मात्र तो सीएसकेचा पूर्णवेळ कर्णधार नव्हता. आता जडेजा मात्र सीएसकेचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून काम पाहिल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘जड्डू’च का? चेन्नईने धोनीचा उत्तराधिकारी म्हणून जडेजाला निवडण्याचे ‘हे’ आहे खास कारण
ख्वाजाची पाकला सजा, धावांचा पाऊस पाडत घेतली यजमानांची मजा; नोंदवला मोठ्ठा रेकाॅर्ड