रविवारी (४ ऑक्टोबर) आयपीएलचा १८ वा सामना दुबई येथे किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात झाला. हा सामना चेन्नईने १० विकेट्सने आपल्या नावावर केला. हा चेन्नईचा या हंगामातील दुसरा विजय होता. या सामन्यात चेन्नईचा हुकमी फलंदाज शेन वॉटसनने एक पराक्रम केला आहे.
नाणेफेक जिंकत पंजाबने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि २० षटकात १७८ धावांचा डोंगर उभारला. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नई संघाकडून सलामीला वॉटसन आणि फाफ डू प्लेसिस हे धुरंदर आले. या दोघांनीही चेन्नईला धडाकेबाज सुरुवात करून दिली. यादरम्यान त्यांनी नाबाद राहात १८१ धावांची शतकी केली आणि चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
यापूर्वी चेन्नई संघातील फलंदाजांनी केलेल्या शेवटच्या ५ शतकी भागीदारींपैकी ४ मध्ये वॉटसनचा समावेश आहे. २०१८ साली त्याने अंबाती रायडू, सुरेश रैना आणि डू प्लेसिससोबत शतकी भागिदारी साकारली होती. त्यानंतर २०१९ मध्ये पुन्हा त्याने रैनासोबत १ वेळा शतकी भागीदारी रचली होती. याव्यतिरिक्त फाफ डू प्लेसिसने आयपीएल २०२० मधील मुंबई इंडियन्सविरुद्धच्या उद्घाटन सामन्यात रायडूसोबत शतकी भागीदारी केली होती.
चेन्नई संघासाठी सर्वोच्च भागीदारी
वॉटसन आणि फाफ डू प्लेसिस यांनी पंजाबविरुद्ध खेळताना चेन्नई संघासाठी सर्वोच्च १८१ धावांची भागीदारी रचली आहे. यामध्ये वॉटसनने (८३) आणि डू प्लेसिसने (८७) धावांचे योगदान दिले. यापूर्वी आयपीएल २०११ मध्ये माईक हसी आणि मुरली विजय यांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध खेळताना १५९ धावांची भागीदारी केली होती.
आयपीएलमध्ये चेन्नई संघासाठीच्या शेवटच्या ६ शतकी भागीदारी
२०१८- शेन वॉटसन आणि फाफ डू प्लेसिस
२०१८- शेन वॉटसन आणि अंबाती रायडू
२०१८- शेन वॉटसन आणि सुरेश रैना
२०१९- शेन वॉटसन आणि सुरेश रैना
२०२०- फाफ डू प्लेसिस आणि अंबाती रायडू
२०२०- शेन वॉटसन आणि फाफ डू प्लेसिस
आयपीएलमध्ये चेन्नई संघासाठी सर्वोच्च भागीदारी-
१८१ धावा- शेन वॉटसन आणि फाफ डू प्लेसिस विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब (२०२०)
१५९ धावा- माईक हसी आणि मुरली विजय विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (२०११)