प्रतिष्ठेच्या ऍशेस कसोटी मालिकेतील पहिला सामना बर्मिंघम येथे खेळला गेला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्याच्या अखेरच्या दिवशी (मंगळवार 20 जून) ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 2 गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत संघाला मालिकेत आघाडी मिळवून दिली. याबरोबरच त्याने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबीन्सन याला उत्तर दिले.
या सामन्यात इंग्लंड संघाने अत्यंत आक्रमक खेळ दाखवला होता. पहिल्या दिवशी आठ गडी बाद झालेले असतानाही त्यांनी 393 धावांवर आपला पहिला डाव घोषित केला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने देखील त्यांना आव्हान देत 387 धावा केल्या. कमिन्सच्या गोलंदाजीमुळे इंग्लंडचा दुसरा डाव 300 पर्यंत पोहोचू शकला नाही.
कसोटीच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात 3 बाद 107 धावा केल्या होत्या. त्यांना अखेरच्या दिवशी जिंकण्यासाठी 172 धावांची गरज होती. तत्पूर्वी, तिसऱ्या दिवसाच्या खेळानंतर बोलताना इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सन म्हणालेला,
“आमच्याकडे हा सामना जिंकण्याची मोठी संधी आहे. पॅट कमिन्सला पकडून आम्हाला ऑस्ट्रेलियाचे फक्त चार गडी बाद करायचे आहेत. कारण ऑस्ट्रेलियन संघ तीन अकरा क्रमांकाचे फलंदाज घेऊन खेळत आहे.”
त्याचा रोख हा ऑस्ट्रेलियाचे अखेरच्या तीन क्रमांकावरील फलंदाज स्कॉट बोलॅंड, नॅथन लायन व जोश हेजलवूड यांच्याकडे होता. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या याच फलंदाजांनी त्यांना शेवटच्या डावात घाम फोडला. नाईट वॉचमन म्हणून पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या बोलॅंड याने 20 धावा केल्या. त्यानंतर केवळ दोन गडी बाकी असताना ऑस्ट्रेलियाला आणखी 54 धावा करणे गरजेचे होते. असे असताना कर्णधार कमिन्सने लायनला साथीला घेऊन अखेरपर्यंत किल्ला लढवला. दोघांनी नाबाद राहत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. कमिन्सने 44 तर लायनने अति महत्त्वाच्या 16 धावा केल्या. त्यामुळे रॉबिन्सन याच्या वक्तव्याचे चोख उत्तर ऑस्ट्रेलियन संघाने दिल्याचे बोलले जात आहे.
(Cummins And Lyon Perfect Reply To Robbinson On Tail Enders Statement)
महत्वाच्या बातम्या –
शाब्बास पोरींनो! भारतीय मुलींनी जिंकला इमर्जिंग आशिया कप, फायनलमध्येही श्रेयंका चमकली
वेंगसरकरांनी सांगितली धोनीच्या कर्णधार होण्याची इनसाईड स्टोरी! म्हणाले, “आम्हाला दिसले होते की…”