इंडियन प्रीमीयर लीग म्हणजेच आयपीएल ही जगात लोकप्रिय असलेली टी२० क्रिकेट लीग आहे. या लीगमध्ये विविध देशांतील क्रिकेटपटू उत्साहाने सहभागी होत असतात. या लीगचा आता १४ वा हंगाम लवकरच सुरु होत आहे. ९ एप्रिलला गतविजेते मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या सामन्याने या हंगामाला सुरुवात होईल. त्यामुळे सध्या सर्वच संघातील खेळाडूंची तयारी सुरु आहे. दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरचा त्याच्या मुलीबरोबरचा एक गोंडस व्हिडिओ व्हायरल होत आहे.
मंगळवारी (६ एप्रिल) राजस्थान रॉयल्स संघाने सोशल मीडियावर बटलर त्याच्या २ वर्षांच्या मुलीसह व्यायाम करत असलेला एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की बटलर त्याच्या मुलीला कडेवर घेऊन व्यायाम करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर जेव्हा बटलर पुशअप्स मारत असताना त्याची मुलगीही त्याच्या प्रमाणेच करण्याचा प्रयत्न करत आहे. पुढेही ती तो जे जे करत आहे, त्या गोष्टींची नक्कल करताना दिसत आहे.
बटलरच्या मुलीचे नाव जॉर्जिआ आहे. त्यांचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून चाहत्यांकडून या व्हिडिओला मोठी पसंती मिळत आहे.
https://twitter.com/rajasthanroyals/status/1379290267732283392
बटलर राजस्थान रॉयल्सचा महत्त्वाचा भाग
बटलरने २०१६ साली मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर २०१८ च्या हंगामापासून तो राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे. तेव्हापासून तो राजस्थान रॉयल्सचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. त्याने आयपीएलमध्ये राजस्थानकडून खेळताना २०१८ साली १३ सामन्यांत ५४८ धावा, २०१९ साली ८ सामन्यांत ३११ धावा आणि २०२० साली १३ सामन्यांत ३२८ धावा केल्या आहेत. या ३ हंगामात मिळून त्याने राजस्थानकडून १० अर्धशतके केली आहेत.
यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणार बटलर
राजस्थान रॉयल्सने आगामी आयपीएल हंगामासाठी राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व संजू सॅमसनकडे सोपवले आहे. त्यामुळे यंदा सॅमसन नेतृत्वाच्या नव्या जबाबदारीसह खेळणार आहे. विशेष म्हणजे त्याच्या नेतृत्वाखाली बटलर, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, ख्रिस मॉरीस, असे दिग्गज खेळाडू खेळताना दिसणार आहेत.
राजस्थान रॉयल्स आयपीएल २०२१ हंगामामधील पहिला सामना १२ एप्रिलला पंजाब किंग्सविरुद्ध मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
तब्बल सात वर्षांनंतर आयपीएलमध्ये खेळणार असलेल्या पुजाराची अशी आहे टी२० कारकिर्द; एक शतकही आहे नावावर
आयपीएलमध्ये बीसीसीआय आणि खेळाडूंची होती इतक्या कोटींची कमाई; पाहून बसेल आश्चर्याचा धक्का