क्रिकेट विश्वचषक २०१९ ला ३० मे रोजी यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका सामन्याने सुरुवात होणार आहे. हा विश्वचषक ३० मे ते १४ जुलै या कालावधीत पार पडणार आहे. भारतीय संघ विश्वचषकातील पहिला सामना ५ जून रोजी दक्षिण आफ्रिका संघासोबत खेळणार आहे.
भारतीय संघ २०१५ विश्लचषकात उपांत्यफेरीत बाहेर पडला होता. हा विश्वचषक ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने संयुक्तरित्या आयोजीत केला होता.
आता पुढील विश्वचषक इंग्लंडमध्ये होत असून भारतीय संघ या विश्वचषकाचा प्रबळ दावेदार आहे.
विश्वचषकात सहजा विश्वविक्रम कमीच होतात. परंतु संघ दुबळे असतील तर मात्र विक्रमांची रेलचेल असते. या विश्वचषकात केवळ टाॅपचे १० संघ सहभागी होत असल्यामुळे विक्रम तसे कमीच होताना दिसतील. परंतु तरीही गेल्या विश्वचषकातील काही विक्रम मात्र मोडण्याची शक्यता आहे. त्यातील काही निवडक विक्रम असे-
३. विश्वचषकातील वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्येचा विक्रम-
२००९मध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने वनडे क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच द्विशतकी खेळी केली. त्यानंतर आजपर्यंत वनडे क्रिकेटमध्ये ७ खेळाडूंनी द्विशतके केली आहे. त्यात दोन द्विशतके २०१५ विश्वचषकात झाली होती. आतापर्यंत ११ विश्वचषक झाले असून पहिल्या १० विश्वचषकात कधीही द्विशतकं पहायला मिळाले नव्हते. परंतु गेल्या विश्वचषकात मार्टीन गप्टीलने नाबाद २३७ धावा विंडीजविरुद्ध तर ख्रीस गेलने झिंबाब्वेविरुद्ध २१५ धावा चोपल्या होत्या. २३७ ही विश्वचषकातील वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या आहे.
विश्वचषकात वैयक्तिक सर्वाधिक धावा कऱणारे ५ खेळाडू
२३७*- मार्टीन गप्टील, २०१५, विरुद्ध विंडीज
२१५- ख्रीस गेल, २०१५, विरुद्ध झिंबाब्वे
१८८*- गॅरी कर्टन, १९९६, विरुद्ध युएई
१८३- सौरव गांगुली, १९९९, विरुद्ध श्रीलंका
१८१- व्हीव्हीयन रिचर्ड, १९८७, विरुद्ध श्रीलंका
२. एकाच विश्वचषकात सर्वाधिक शतकी खेळी-
२०१५ विश्वचषकात श्रीलंकेचा महान कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज कुमार संगकाराने ४ शतकी खेळी केल्या होत्या. ७ सामन्यात १०८.२०च्या सरासरीने त्याने ५४१ धावा करताना या शतकी खेळी केल्या होत्या. त्याच्या या चार शतकी खेळीमुळे विश्वचषक इतिहासात सर्वाधिक शतकी खेळी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या स्थानी आला आहे. या यादीत ६ शतकांसह सचिन अव्वल स्थानी आहे.
एकाच विश्वचषकात ३ शतकी खेळी मेथ्यु हेडन (२००७), मार्क वाॅ (१९९६), सौरव गांगुली (२००३) यांच्या नावावर आहे. या विश्वचषकात अनेक खेळाडूंना ४ शतकांचा विक्रम मोडण्याची संधी आहे. कारण इंग्लंडमधील फलंदाजीसाठी पोषक खेळपट्ट्या आणि प्रत्येक संघाला साखळी फेरीत खेळायला मिळणारे ९ सामने महत्त्वाचे ठरणार आहेत. यात विराट कोहली, रोहित शर्मा आणि शिखर धवन यांची नावं नक्कीच वरच्या स्थानी येतील.
१. विश्वचषकातील डावातील सांघिक सर्वोत्तम धावसंख्या-
२०१५ विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानविरुद्ध ७ बाद ४१७ धावा केल्या होत्या. ही विश्वचषकातील सर्वोत्तम धावसंख्या ठरली होती. परंतु या विश्वचषकापुर्वी इंग्लंड संघ सतत मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना दिसत आहे. तसेच अनेक नियम हे आता फलंदाजीसाठी पोषक ठरत आहेत. त्यामुळे या विश्वचषकात हा विक्रम मोडण्याची शक्यता आहे.