गोल्ड कोस्ट। २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा नेमबाज संजीव राजपूतने आज सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. त्याने ५० मीटर रायफल पोझिशन ३ प्रकारात ही सुवर्णमय कामगिरी केली आहे.
८ नेमबाजांमध्ये झालेल्या अंतिम फेरीत संजीवने विक्रमी ४५४.५ पॉईंट्सची कमाई करत सुवर्णपदक आपल्या नावावर केले. राजपूतची या लढतीत चांगली सुरुवात झाली नव्हती पण त्यानंतर त्याने त्याची कामगिरी उंचावत नेली.
या स्पर्धेत भारताचाच चेन सिंग पाचव्या स्थानावर राहिला आहे. त्याने अंतिम फेरीत ४१९.१ पॉईंट्स मिळवले आहेत.
संजीवचे हे राष्ट्रकुल स्पर्धेतील पहिलेच सुवर्णपदक असून एकूण तिसरे पदक आहे. याआधी त्याने २०१४ मध्ये ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य तर २००६ मध्ये मेलबर्न येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक मिळवले होते.
२१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला नेमबाजीत आतापर्यंत एकूण १६ पदके मिळाली असून यात ७ सुवर्णपदके, ४ रौप्य आणो ५ कांस्य पदकांचा समावेश आहे.