गोल्ड कोस्ट। ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत आज टेबल टेनिसमध्ये मिश्र दुहेरीत भारताला कांस्यपदक मिळाले आहे. मनिका बात्रा आणि ज्ञानसेकरन सथियान या जोडीने हे पदक भारताला मिळवून दिले आहे.
कांस्यपदकासाठीच्या या सामन्यात आज मनिका बात्रा – ज्ञानसेकरन सथियान आणि मौमा दास – अचंता शरथ या दोन भारतीय जोड्याच आमने सामने होत्या. यात मनिका – ज्ञानसेकरन यांनी मौमा- अचंता यांच्यावर ११-६,११-२,११-४ अशी तीन गेम्समध्ये मात करत सामना ३-० असा जिंकला.
भारताच्या या दोन्ही जोड्या उपांत्य सामन्यात पराभूत झाल्या होत्या, त्यामुळे त्यांना सुवर्णपदकाचा शर्यतीतून बाहेर पडावे लागले होते. पण त्यांच्याकडे कांस्यपदक मिळवण्याची संधी होती. या संधीचा फायदा घेत मनिका – ज्ञानसेकरन यांनी कांस्यपदक पटकावले.
भारताचे हे या स्पर्धेतील टेबल टेनिसमधील आठवे पदक आहे. तसेच मणिकाचे हे या स्पर्धेतील एकूण चौथे पदक ठरले आहे. तिने याआधी महिला सांघिक स्पर्धेत एकेरीत सामन्यात विजय मिळवत भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवून दिले होते. तसेच काल महिला एकेरीतही तिने सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. याबरोबरच तिने महिला दुहेरीमध्ये मौमा दासच्या साथीने रौप्य पदक मिळवले आहे.
तर ज्ञानसेकरनचे हे या स्पर्धेत एकूण तिसरे पदक होते. याआधी त्याला पुरुष सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक तर पुरुष दुहेरीत रौप्यपदक मिळाले आहे.