भारतीय महिला क्रिकेट संघ कॉमनवेल्थ गेम्स २०२२च्या स्पर्धेत सुवर्ण पदकाची प्रबळ दावेदार या रुपात उतरणार आहे. गुरूवारपासून (२८ जुलै) सुरू झालेल्या या स्पर्धेत प्रथमच महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. तर २४ वर्षानंतर क्रिकेटचे या स्पर्धेत पुनरागमन होत आहे. ८ ऑगस्टपर्यंत खेळली जाणारी ही स्पर्धा बर्मिंघम येथे सुरू आहे. तसेच क्रिकेटचे सामने टी२०च्या स्वरूपात खेळले जाणार आहेत.
भारतीय संघ या स्पर्धेत हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. क्रिकेट बोर्डने निवडलेल्या १५ जणींच्या या संघात अनेक खेळाडू उपस्थित आहेत त्यांची चमकदार कामगिरी या स्पर्धेत महत्वाची ठरणार आहे. भारताचा अ गटात समावेश असून त्यामध्ये ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि बार्बाडोस हे संघ आहेत.
भारताची सलामीची खेळाडू शेफाली वर्मा (Shafali Verma) ही जगातील उत्कृष्ठ टी२० फलंदाजांपैकी एक आहे. तिने २०२०च्या टी२० विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या. तिने ५ सामन्यांत १५८ पेक्षाच्या अधिक स्ट्राईक रेटने १६३ धावा केल्या होत्या. पॉवरप्लेमध्ये जलद धावा करण्यात तिचा हातखंडा आहे. यामुळे कॉमनवेल्थमध्ये ती संघाला आक्रमक सुरूवात करून देऊ शकते. शेफालीने ३२ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात १३९पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने ७५३ धावा केल्या आहेत.
भारताची कर्णधार हरमनप्रीतचाही समावेश जगातील विस्फोटक फलंदाजांमध्ये केला जातो. तिच्याकडे १०० पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळण्याचा अनुभव आहे. कर्णधाराबरोबरच ती अष्टपैलू खेळाडू असल्याने संघाच्या जमेची बाजू आहे.
हरमनप्रीतने मधल्या फळीत फलंदाजी करताना भारतासाठी अनेक सामन्यांत महत्वाची भुमिका पार पाडली आहे. २०१८ वर्ष तिच्यासाठी निराशाजनक ठरले तर २०२२मध्ये तिने तिच्या कारकिर्दीतील एकाच वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम केला आहे. तिने यावर्षी चार सामन्यात ५२च्या सरासरीने १०४ धावा केल्या आहेत.
अष्टपैलू दीप्ती शर्मा (Deepti Sharma) ही भारतासाठी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात उत्तम कामगिरी करत आहे. ही फिरकीपटूने मधल्या फळीत फलंदाजीला येत संघाला मजबूत करते. तसेच ती उत्तम क्षेत्ररक्षणही करते. तिने ६१ आंतराष्ट्रीय टी२० सामन्यात ५२० धावा करताना ६३ विकेट्सही घेतल्या आहेत. सध्या ती महिलांच्या आयसीसी गोलंदाजी क्रमवारीत पाचव्या, तर अष्टपैलूंच्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे.
दीप्ती मधल्या षटकांमध्ये उत्तम फलंदाजी करते. स्ट्राईक रोटेट करण्यात ही माहीर असून तिला बाद करण्यासाठी गोलंदाजांना खूप मेहनत करावी लागते. लागोपाठ विकेट घेण्यात ती ओळखली जाते, याचा भारतीय संघाला कॉमनवेल्थमध्ये फायदा होणार आहे.
या स्पर्धेत शेफाली आणि संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना (Smriti Mandhana) सलामीला येणार आहे. शॉर्ट ऑफ लेंग्थ चेंडूवर धावा कशा करायच्या याचे कौशल्य स्म्रितीला चांगलेच माहित आहे. तिने नुकतेच इंग्लंडमध्ये ३ टी२० सामन्यात ११९ धावा केल्या आहेत. या स्पर्धेतही अशाच धावा करण्याचे सातत्य राखण्याचा ती प्रयत्न करणार आहे.
फिरकीपटू राजेश्वरी गायकवाडने पण संघासाठी अनेक सामन्यात उत्तम गोलंदाजी करत संघाला विकेट्स मिळवून दिल्या आहेत. सुरूवातील विकेट्स घेण्यात ती तत्पर आहे. तिने ३६ टी२० सामन्यात ४५ विकेट्स घेतल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कर्णधार ‘गब्बर’ ठरतोय माहीपेक्षाही वरचढं?, केलीये ‘या मोठ्या विक्रमाची बरोबरी