ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 (CWG) मध्ये शनिवार (1 ऑगस्ट) भारतासाठी ऐतिहासिक ठरला. भारताच्या एकूण पदकांमध्ये मोठी भर पडली. यामध्ये सर्वाधिक वाटा बॉक्सिंग संघांचा होता, मात्र ऍथलेटिक्सही काही मागे राहिले नाही. गुलवीर सिंगने पुन्हा एकदा ऐतिहासिक पदक जिंकण्याची कामगिरी केली आहे.
गुलवीरने या स्पर्धेतील 5000 मीटर शर्यतीमध्ये कांस्यपदक जिंकले आहे, ज्यामुळे तो एकाच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दोन ऐतिहासिक पदके जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे. याआधी त्याने 28 जुलैला 10,000 मीटरमध्ये रौप्यपदक जिंकले होते. आता त्याने 5000 मीटर शर्यतीत 13 मिनिटे 24.95 सेकंदांची वेळ नोंदवत तिसरे स्थान गाठले.
5000 मीटर शर्यतीत केनियाच्या मॅथ्यू किपचुम्बा किपसांग याने 13:23.61 सेकंदांची वेळ नोंदवत सुवर्णपदक आणि ऑस्ट्रेलियाच्या काय रॉबिन्सनने 13:24.70 सेकंदांची वेळ नोंदवत रौप्यपदक जिंकले. तसेच त्याने 10,000 मीटर शर्यतीत सुवर्णपदकाची कामगिरी केली होती.
शेवटच्या क्षणांमध्ये गुलवीरची पदकविजेती कामगिरी
शनिवारी (1 ऑगस्ट) रात्री उशिरा 5000 मीटर शर्यत पार पडली. यामध्ये गुलवीर सुरूवातीपासून चांगली कामगिरी करत अंतिम फेरीपर्यंत पहिल्या पाचमध्ये टिकून होता, मात्र अंतिम फेरी सुरू होताच तो तो एका स्थानाने मागे पडला. तेवढ्यात निर्णायक क्षणी त्याने वेग वाढवला आणि तिसरे स्थान पटकावले.
गुलवीरला शेवटच्या 200 ते 300 मीटरमध्ये केनियाच्या कॉर्नेलियम केम्बोईने मागे टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय खेळाडूने हार मानली नाही. अखेरीस 13:24.95 सेकंदांत शर्यत पूर्ण करत कांस्यपदक जिंकले. त्याने केनियाच्या धावपटूला अवघ्या 0.04 सेकंदांनी मागे टाकले.
बॉक्सर्सचे 7 गोल्डन पंच
बॉक्सिंगमध्ये प्रीती पवार (महिला 54 किलो), जास्मिन लंबोरिया (महिला 57 किलो), साक्षी चौधरी (महिला 51 किलो), प्रिया घंघास (महिला 60 किलो), अरुधंती चौधरी (महिला 70 किलो), सचिन सिवाच (पुरुष 60 किलो) आणि अंकुश पंघाल (पुरुष 80 किलो) यांनी सुवर्णपदकांची कामगिरी केली. तसेच नरेंदर बेरवाल (पुरुष +90 किलो) आणि लव्हलिना बोरगोहेन (महिला 75 किलो) यांना रौप्यपदकांवर समाधान मानावे लागले.
भारत पदकतालिकेत टॉप 5 मध्ये
भारताच्या दहाही बॉक्सर्सनी पदके जिंकल्याने भारताच्या पदकांमध्ये मोठी भर पडली. भारताच्या एकूण पदकांमध्ये शनिवारी 16 संख्येने भर पडली, ज्यामध्ये 8 सुवर्ण, 5 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. यामुळे भारताच्या पदकांची एकूण संख्या 39 झाली आहे. त्यामुळे भारत पदकतालिकेत आता चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.
भारताने CWG 2026 मध्ये आतापर्यंत 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 8 कांस्यपदके जिंकले आहेत. (CWG 2026 Gulveer Singh wins bronze medal in men’s 5000m becomes first Indian to win two medals in a single CWG edition in athletics.)






