बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रविवारी (७ ऑगस्ट) सर्वांची नजर प्रथमच समाविष्ट केल्या गेलेल्या महिला क्रिकेट अंतिम सामन्यावर होती. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारताच्या मध्य फळीने केलेल्या हाराकरीमुळे भारतीय संघाला सुवर्णपदकापासून वंचित रहावे लागले. शेवटच्या ३५ धावात ८ बळी मिळवत ऑस्ट्रेलियाने अचानक तख्तापलट करत सुवर्णपदक आपल्या नावे केले.
🥈 medallists at the inaugural women's cricket competition at the #CommonwealthGames 👉 #TeamIndia#EkIndiaTeamIndia | #B2022 pic.twitter.com/DorTgdw0ly
— Team India (@WeAreTeamIndia) August 7, 2022
खऱ्या अर्थाने ऐतिहासिक असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. एलिसा हिली लवकर बाद झाल्यानंतर बेथ मुनी व मेग लेनिंग या जोडीने ७४ धावांची भागीदारी रचली. या भागीदारीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने निर्धारित २० षटकात १६१ धावा केल्या. मुनीने सर्वाधिक ६१ धावा केल्या. भारतासाठी स्नेह राणा आणि रेणुका सिंहने प्रत्येकी दोन बळी मिळवले.
प्रत्युत्तरात, भारतीय संघाची साथ दोन्ही सलामीवीर स्मृती मंधाना व शफाली वर्मा यांनी २२ धावा झालेल्या असतानाच सोडली. संघाला या सामन्यात एकतर्फी पराभव पत्करावा लागतो की काय असे वाटत असताना, कर्णधार हरमनप्रीत कौर व जेमिमा रॉड्रिग्जने जबाबदारीने खेळ केला. दोघींनी खराब चेंडूंचा समाचार घेत चौकार-षटकार वसूल केले. तसेच एकेरी-दुहेरी धाव घेत धावफलक हलता ठेवला. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी केली.
मेगन शूटने जेमिमाला ३३ धावांवर बाद करताच भारताच्या गोटात खळबळ माजली. पूजा वस्त्रकार १ धाव करून माघारी परतली. दबाव वाढत असताना हरमनप्रीतही मोठा फटका खेळण्याच्या नादात वैयक्तिक ६५ धावा करून बाद झाली. त्यानंतर कोणालाही खेळपट्टीवर टिकता आले नाही. अखेरच्या षटकात विजयासाठी ११ धावांची गरज असताना, भारताच्या उरलेल्या दोनही फलंदाज बाद झाल्या व ऑस्ट्रेलियाने ९ धावांनी सामना जिंकत, ऑस्ट्रेलियाच्या पारड्यात आणखी एक सुवर्णपदक टाकले.