भारत आणि पाकिस्तान महिला संघ रविवारी (३१ जुलै) आमने-सामने आले. सध्या बर्मिंघम, इंग्लंड येथे कॉमनवेल्थ स्पर्धा सुरू आहे. त्यामध्ये पहिल्यांदाच महिला क्रिकेटचा (Women Cricket In Commonwealth Games) समावेश करण्यात आला आहे. तर रविवारी भारताने या स्पर्धेतील दुसरा सामना खेळताना पाकिस्तानचा पराभव केला. त्याचबरोबर भारताने कॉमनवेल्थ गेम्समध्ये एक विशेष कामगिरी करत मोठा पराक्रम रचला आहे.
या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय चांगलाच अंगलट आल्याचे दिसले. त्यांनी पहिलीच विकेट सामन्याच्या दुसऱ्या षटकातच्या तिसऱ्या चेंडूवर गमावली. तेव्हा पाकिस्तान संघाचे खाते देखील उघडले नव्हते. इरम जावेदला मेघना सिंगने यष्टीरक्षक यस्तिका भाटियाकरवी झेलबाद केले.
पहिल्या दोन सामन्यात धावसंख्या शून्य असताना विरोधी संघाची पहिली विकेट काढणे अशी कामगिरी करण्याची भारताची ही सलग दुसरी वेळ आहे. या स्पर्धेत भारताने ऑस्ट्रेलिया विरोधात असाच पराक्रम केला आहे. तसेच १९९८मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये पुरूष क्रिकेट सामन्यातही अशी कामगिरी कोणालाही करता आली नाही.
त्याचबरोबर भारतीय महिला संघाने २०११मध्ये वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावरही सर्वप्रथम अशी कामगिरी केली होती. त्यांनी पहिल्या टी२० सामन्यात वेस्ट इंडिजची धावसंख्या शून्य असताना पहिली विकेट काढली होती.
या सामन्यात भारताने पाकिस्तानला ८ विकेट्सने पराभूत केले आहे. भारताने प्रथम गोलंदाजी आणि नंतर फलंदाजी या दोन्ही विभागात उत्तम कामगिरी केली आहे. या स्पर्धेतील हा सामना पावसामुळे १८ षटकांचा करण्यात आला. पाकिस्तान संघ १० विकेट्स गमावत ९९च धावा करू शकला.
स्नेह राणाने ४ षटकात १५ धावा देत २ विकेट्स घेतल्या. राधा यादवने २ तर रेणुका सिंग, मेघना सिंग,आणि शेफाली वर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने ८ विकेट्स आणि ३८ चेंडू शिल्लक राखत सामना जिंकला आहे. यावेळी स्म्रीती मंधानाने ४२ चेंडूत नाबाद ६३ धावा केल्या. यामध्ये ८ चौकार आणि ३ षटकाराचा समावेश आहे.
या विजयाबरोबरच भारत अ गटाच्या गुणतालिकेत प्रथम स्थानावर पोहोचला आहे. भारताला आता साखळी फेरीतील त्यांचा तिसरा आणि शेवटचा सामना बारबाडोस संघाविरुद्ध खेळायचा आहे, जो ३ ऑगस्ट रोजी खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
स्मृती मंधानाची पाकिस्तानविरुद्ध वादळी खेळी! ६३ धावा फटकावत रोहित-विराटच्या मांदियाळीत सामील
टीम इंडिया जिंकतेय तरी ‘या’ चार समस्या वाढवतायेत डोकेदुखी