नाशिक : स्पर्धात्मक दृष्टीने शालेय विद्यार्थ्यांना सायकलिंगचा खेळ म्हणून संधी मिळावी या उद्देशाने नाशिक सायकलीस्टतर्फे ‘नाशिक सायकलीस्ट स्प्रिंटर्स’ या उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. नाशिक शहरात मुंबई, पुणेच्या तुलनेत सायकलिंगला शालेय विद्यार्थ्यांकडून खेळ म्हणून निवडताना मागासलेपण दिसून येत आहे. सायकलिंगचा खेळ म्हणून प्रचार व्हावा या दृष्टीने खेळाडू तयार करण्यासाठी नाशिक सायकलीस्ट हा उपक्रम घेऊन येत असल्याची माहिती शैलेश राजहंस यांनी दिली.
या उपक्रमाच्या लोगोचे अनावरण आज नाशिक मध्ये देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण सभागुहात झालेल्या अध्यक्ष निवडीच्या कार्यक्रमात करण्यात आले. तुकाराम नवले यांच्यावर जबाबदारी टाकलेल्या या उपक्रमातून सायकलिंगला खेळ म्हणून पुढे आणण्याचे काम करण्यात येणार आहे.
शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक दृष्टीकोनातून मार्गदर्शन व तंत्रशुद्ध सायकल प्रशिक्षण देऊन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या रविवारी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. १७/१४/११ वर्षाखालील मुले मुली अशा एकूण सहा गटात या स्पर्धा होणार असून अनुक्रमे ९/६/३ किमी अशा अंतराच्या या स्पर्धा होतील.
वरिष्ठ गटामध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांचेमार्फत घेतल्या जाणाऱ्या शालेय स्पर्धांच्या धर्तीवर या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. टाईम ट्रायल व मास ट्रायल या दोन प्रकारामध्ये रोड बाईक व एमटीबी बाईक यांच्या वेगवेगळ्या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना इंदिरा नगर येथील भांड सायकल्स कडून प्रथम क्रमांकास १०००, द्वितीय ५०० तर तृतीय क्रमांकास २५० रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे.
या उपक्रमाचा प्रमुख उद्देश म्हणजे मनपाच्या शाळेत तसेच आदिवासी भागातील शाळांत शिकणाऱ्या मुलांना स्पर्धात्मक सायकलिंगसाठी तयार करणे असून या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे.
यावेळी नाशिक सायकलीस्ट फाउंडेशनचे आधारस्तंभ हरीश बैजल, वैभव शेटे, विशाल उगले, सोफिया कपाडिया, नीता नारंग, डॉ. मनीषा रौदळ, योगेश शिंदे, श्रीकांत जोशी, नाना फड, रत्नाकर आहेर, दत्तू आंधळे, संदीप जाधव, ज्ञानेश्वर गायकवाड, नाशिक जिल्हा सायकलिंग असोसिएशनचे नितीन नागरे उपस्थित होते.