झेक प्रजासत्ताकची स्टार टेनिसपटू बार्बोरा क्रेजिकोव्हा हिनं विम्बल्डन 2024 च्या महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. लंडनमध्ये शनिवारी (13 जुलै) खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात 31व्या मानांकित क्रेजसिकोव्हानं इटलीच्या 7व्या मानांकित जास्मिन पाओलिनीचा 6-2, 2-6, 6-4 असा पराभव केला.
हा अंतिम सामना 1 तास 56 मिनिटं चालला. अंतिम लढतीत क्रेजिकोव्हानं पहिला सेट सहज जिंकला. मात्र, जस्मिननं दुसऱ्या सेटमध्ये दमदार पुनरागमन करत सामना निर्णायक सेटपर्यंत नेला. तिसऱ्या आणि शेवटच्या सेटमध्ये चुरशीची स्पर्धा झाली, ज्यात क्रेज्सिकोव्हानं बाजी मारली.
28 वर्षीय क्रेजिकोव्हाचं हे दुसरी ग्रँड स्लॅम एकेरी फायनल होती. याआधी तिनं 2021 मध्ये फ्रेंच ओपनचं विजेतेपद पटकावलं होतं. तर जस्मिनची देखील ही दुसरी ग्रँड स्लॅम फायनल होती. मात्र, यावेळीही तिला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. जस्मिननं विजेतेपद पटकावलं असतं विम्बल्डन एकेरीचा खिताब जिंकणारी पहिली इटालियन खेळाडू ठरली असती.
क्रेजिकोव्हानं उपांत्य फेरीच्या सामन्यात 2022 ची विम्बल्डन चॅम्पियन एलेना रायबाकिना हिचा 3-6, 6-3, 6-4 असा पराभव केला होता. तर पाओलिनीनं डोना वेकिचचा 2-6, 6-4, 7-6 (10-8) असा पराभव केला. या दोन्ही खेळाडूंनी उपांत्य फेरीत आक्रमक खेळ दाखवला होता.
या वर्षी जास्मिन पाओलिनी सलग दुसरी ग्रँडस्लॅम एकेरीची फायनल खेळत होती. 2016 नंतर महिला खेळाडूनं एकाच वर्षात फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन ओपनची अंतिम फेरी गाठण्याची ही पहिलीच वेळ आहे. फ्रेंच ओपन 2024 च्या अंतिम फेरीत पाओलिनीला इगा स्विटेककडून पराभव पत्करावा लागला होता.
दुसरीकडे, रविवारी (14 जुलै) पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचा सामना तिसरा मानांकित स्पेनच्या कार्लोस अल्काराजशी होणार आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात द्वितीय मानांकित जोकोविचने इटलीच्या 25व्या मानांकित लोरेन्झो मुसेट्टीचा 6-4, 7-6, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव केला होता. तर अल्काराझनं उपांत्य फेरीत रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा 6-7, 6-3, 6-4, 6-4 असा पराभव केला. अल्काराझनं गेल्या वर्षी नोव्हाक जोकोविचचा पराभव करून विजेतेपद पटकावले होतं. आता जोकोविचकडे त्या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑलिम्पिकमध्ये फक्त 5 रिंग का असतात? रिंगच्या रंगांचा अर्थ काय? सर्वकाही जाणून घ्या
कपिल देव यांचे प्रयत्न फळाला! कॅन्सरशी लढा देत असलेल्या माजी क्रिकेटपटूला बीसीसीआयकडून तातडीनं मदतीची घोषणा
रिकी पाँटिंगनंतर दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक कोण बनेल? सौरव गांगुलीनं केला खुलासा