प्रो कबड्डीमध्ये ७४ वा सामना मोतीलाल नेहरू स्कूल ऑफ स्पोर्ट्स,सोनिपत येथे हरयाणा स्टीलर्स आणि दबंग दिल्ली यांच्यात होणार आहे. एका दिवसाच्या विश्रांती नंतर हरयाणाचे खेळाडू पुन्हा घरच्या मैदानावर सामना खेळतील. मागील सामन्यातील मानहानीकारक पराभव विसरून ते या सामन्यात दाखल होतील.
हरयाणाचा संघ मागील सामन्यांपर्यंत उत्तम लयीत होता. परंतु त्यांना मागील सामन्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. या सामन्यात हरयाणा संघाने खेळाच्या सर्व पातळ्यांवर नांग्या टाकल्या. तेलुगू टायटन्सने त्यांना सामन्यात डोके वर काढण्याची संधीच दिली नाही. मागील सामन्यात दुखापतग्रस्त विकास कंडोलाची उणीव हरयाणा संघाला भासली. मागील सामन्यात या संघाचा एकही रेडर प्रभावी कामगिरी करू शकला नाही. प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमातील सर्वोत्तम डिफेन्सीव्ह संघ म्हणून बिरुद मिरवणाऱ्या या संघाला डिफेन्समध्ये देखील चांगली कामगिरी करता आली नाही.
हरयाणा स्टीलर्स संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर त्यांच्या रेडर्स आणि डिफेंडर्स यांना उत्तम कामगिरी करावी लागेल. मागील शेवटचा सामना वगळता रेडींगमध्ये प्रशांतकुमार राय, वजीर सिंग हे उत्तम कामगिरी करत होते. त्यांना दिपक दहिया तिसरा मुख्य रेडर म्हणून चांगली साथ देत होता. या सामन्यात त्यांना पुन्हा चांगली कामगिरी करावी लागणार आहे. या संघाची मजबुती या संघाचा डिफेन्स आहे. त्यामुळे या सुरिंदर नाडा आणि मोहित चिल्लर या अनुभवी जोडीदारांना पुन्हा लयीत येणे गरजेचे आहे.
दबंग दिल्लीच्या संघ सततच्या पराभवाच्या मालिकेतून बाहेर आला आहे. त्यांनी मागील पाच सामन्यात फक्त एक पराभव स्वीकारला आहे. तीन सामन्यात विजय तर एक सामना बरोबरीत सोडवण्यात या संघाला यश आले आहे. हा संघ खेळाच्या दोन्ही पातळ्यांवर चांगला खेळ करत असून या संघाचा कर्णधार मेराज शेख चांगल्या लयीत आहे. डिफेन्समध्ये निलेश शिंदे आणि बाजीराव होडगे उत्तम कामगिरी करत आहेत. महाराष्ट्रीयन प्रशिक्षक रमेश भाईंदिगिरी यांच्या सर्व चाली योग्यवेळी सामन्याचे चित्र बदलावण्यात यशस्वी ठरत आहे. एकंदरीत हा संघ सध्या उत्तम कामगिरी करत आहे.
या सामन्यात हरयाणा स्टीलर्स संघाला विजयाची जास्त संधी आहे. परंतु मागील सामन्यातील पराभव विसरून त्यांना या सामन्यात रेडींगमध्ये उत्तम कामगिरी करावी लागेल. हा सामना दबंग दिल्लीचे रेडर विरुद्ध हरयाणाचे डिफेंडर्स असा होण्याचे जास्त चिन्हे आहेत.