प्रो कबड्डी लीगमधून (Pro Kabaddi League) महत्त्वाची बातमी समोर येत आहे. दबंग दिल्लीने (Dabang Delhi) प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामाचा किताब आपल्या नावावर केला आहे. अंतिम सामन्यात दबंग दिल्लीने पाटना पायरेट्सला (Patna Pirates) ३७-३६ ने मात देत विजय मिळवला. हा दबंग दिल्लीचा पहिलाच विजय असून त्यांनी पाटना पायरेट्सच्या चौथ्यांदा किताब जिंकण्याच्या स्वप्नाचा चुराडा केला आहे.
दबंग दिल्लीच्या विजयाचे हिरो विजय मलिक आणि नवीन कुमार राहिले. विजयने १४, तर नवीनने १३ गुण मिळवले. पाटनासाठी सचिन तन्वरने १० आणि गुमान सिंगने ९ गुण मिळवले.
प्रो कबड्डी लीगच्या ७ हंगामांचे विजेते
यापूर्वी पार पडलेल्या ७ हंगामाच्या विजेत्या संघाबद्दल बोलायचं झालं, तर २०१४ सालच्या पहिल्या हंगामाचा विजयी संघ जयपूर पिंक पँथर्स हा होता. २०१५ साली दुसऱ्या हंगामावर यू मुंबाने आपली मोहोर उमटवली होती. जानेवारी २०१६ मध्ये पार पडलेल्या तिसऱ्या हंगामाचा विजयी संघ पाटना पायरेट्स होता.
त्यानंतर मार्च २०१६ आणि २०१७ मध्ये अनुक्रम चौथ्या आणि पाचव्या हंगामावर पुन्हा एकदा पाटनाने विजय मिळवला होता. म्हणजेच तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या हंगामाचे किताब पटकावण्याची हॅट्रिक पाटनाने केली होती. त्यानंतर २०१८ साली झालेल्या सहाव्या हंगामावर बेंगळुरू बुल्स आणि २०१९ सालच्या सातव्या हंगामावर बंगाल वॉरिअर्सने आपले नाव कोरले होते.