प्रो कबड्डी लीगमध्ये मंगळवारी (१८ जानेवारी) टॉप थ्री मधील दोन संघ पटना पायरेट्स व दबंग दिल्ली आमनेसामने आले. समान ताकदीच्या या दोन्ही संघांमध्ये ही लढत चांगलीच अटीतटीची झाली. पूर्णवेळेनंतर या सामन्यात दबंग दिल्लीने ३२-२९ विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले.
सामन्याची सुरुवात दोन्ही संघांनी गुण घेत केली. मात्र, प्रमुख रेडर नवीन कुमारच्या अनुपस्थितीत खेळत असलेल्या दिल्लीने उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन केले. अनुभवी अष्टपैलू संदीप नरवाल याने चमकदार खेळ दाखवून सर्वांची मने जिंकली. त्याने पाच, विजयने तीन व आशू मलिकने तीन गुण घेत संघाला पहिल्या हाफमध्ये १९-१० अशा आघाडीवर नेले.
दुसऱ्या हाफची सुरुवात दिल्ली संघासाठी अत्यंत खराब राहिली. पटनाने दुसऱ्या हाफच्या दहा मिनिटात दिल्लीला ऑल आऊट करत एका गुणाची आघाडी घेतली. मात्र, दिल्लीने पुन्हा दोन गुणांची आघाडी घेत सामन्यावर प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न केला. अखेरच्या पाच मिनिटात दिल्लीने सामन्याचा वेळ कमी करण्याचा प्रयत्न केला. पटनाचा कर्णधार प्रशांत राय पुनरामनाच्या प्रतीक्षेत होता. मात्र, विजयने दिल्लीसाठी सुपर रेड करत संघाला पाच गुणांच्या आघाडीवर नेले. दिल्लीसाठी खेळत असलेला इराणीयन लेफ्ट कॉर्नर मोहम्मद मलकने पटनाचा कर्णधार प्रशांत रायला बाद केल्याने पटना सामन्यात माघारला. अखेरच्या मिनिटात सचिनला बाद केल्याने दिल्लीचा विजय निश्चित झाला.