पुणे | आयपीएल २०२२च्या चौदाव्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सला ५ विकेट्सने पराभूत केले. हा मुंबईचा यंदाच्या हंगामातील सलग तिसरा पराभव होता. या सामन्यात मुंबईने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात खराब कामगिरी केली. त्यातही मुंबईकडून डॅनियल सॅम्स हा सर्वात महागडा ठरला. त्याने या सामन्यादरम्यान एका षटकात मोकार मार खाल्ला. यासह आयपीएलमधील एका नकोशा विक्रमाच्या यादीत त्याचे नाव नोंदवले गेले आहे.
या सामन्यात (MI vs KKR) मुंबईच्या १६२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताने १६ षटकांमध्ये ५ विकेट्सच्या नुकसानावर लक्ष्य पूर्ण केले. कोलकात्याच्या पारड्यात विजय टाकण्यात मुंबईच्या सॅम्सचा (Daniel Sams) मोठा हात राहिला. त्याने डावातील १६वे षटक टाकताना तब्बल ३५ धावा दिल्या. त्याच्या षटकातील पहिल्या ४ चेंडूंवर कमिन्सने सलग षटकार, चौकार, षटकार आणि षटकार खेचले.
त्यानंतर पाचवा चेंडू नो बॉल होता, ज्याने कमिन्सने २ धावा घेतल्या व पुढील फ्रि हिटवर चौकार टोलवला. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर षटकार खेचत संघाला सामना जिंकून दिला. अशाप्रकारे मुंबईसाठी सॅम्सचे सर्वात महागडे षटकच सामन्याला हातातून दूर नेणारे षटक ठरले.
सॅम्सने आयपीएलमध्ये टाकलेले हे तिसरे सर्वात महागडे षटक होते. त्याच्यापूर्वी २०२१ मध्ये हर्षल पटेलने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून गोलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध एका षटकात सर्वाधिक ३७ धावा खर्च केल्या होत्या. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झाला होता. तर पी परमेश्वरनेही बेंगलोरविरुद्ध २०११ मध्ये एका षटकात ३७ धावा दिल्या होत्या.
आयपीएलमधील सर्वात महागडे षटक (Most Expensive Overs In IPL)-
३७ – पी परमेश्वरन विरुद्ध आरसीबी (बेंगळुरू, २०११)
३७ – हर्षल पटेल विरुद्ध सीएसके (मुंबई, २०२१)
३५ – डॅनियल सॅम्स विरुद्ध केकेआर (पुणे, २०२२*)
३३ – रवी बोपारा विरुद्ध केकेआर (कोलकाता, २०१०)
३३ – परविंदर अवाना विरुद्ध सीएसके (मुंबई, २०१४)
कोलकाताविरुद्ध मुंबईकरांनी दिल्या भरपूर धावा
दरम्यान मुंबईच्या कोलकाताविरुद्धच्या गोलंदाजी कामगिरीवर नजर टाकायची झाल्यास, सॅम्सव्यतिरिक्त जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स हे अनुभवी गोलंदाजही खास प्रदर्शन करू शकले नाहीत. बुमराहने ३ षटकांमध्ये २६ धावा खर्च केल्या आणि एकही विकेट घेऊ शकला नाही. तर मिल्सने ३ षटकांमध्ये ३८ धावा खर्च करताना २ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
‘ही वेळ अर्जुन तेंडुलकरला संघात आणण्याची’, मुंबईच्या पराभवानंतर चाहत्यांची सोशल मीडियावरून मागणी
पुण्याचा ‘आशिर्वाद’ १५० किलोमीटरचा शेजारी मुंबईपेक्षा १८०० किलोमीटर दूर कोलकात्याला जास्त