आशिया चषक 2022 चा हंगाम शेवटाकडे चालला आहे. शुक्रवारी (09 सप्टेंबर) श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान या संघात शेवटचा सुपर-4 सामना झाला. या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानवर निर्विवाद वर्चस्व गाजवत 5 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यातील दमदार विजयानंतर श्रीलंकेचा कर्णधार दसुन शनाका याने प्रतिक्रिया दिली आहे. संघाच्या प्रदर्शनाबरोबरच त्याने अंतिम सामन्यातील योजनेबद्दलही प्रतिक्रिया दिली आहे.
अखेरच्या सुपर-4 सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ 19.1 षटकातच गुंडाळला गेला. त्यांना 121 धावाच करता आल्या. या डावात श्रीलंकेकडून वानिंदु हसरंगाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच माहिश तिक्षाणा आणि प्रमोद मधुसन यांनीही प्रत्येकी 2 विकेट्स काढल्या. प्रत्युत्तरात पथुम निसांकाच्या अर्धशतकाच्या जोरावर श्रीलंकेने 17 षटकातच सामना जिंकला.
विजयरथावर स्वार श्रीलंका संघाने या विजयासह पाकिस्तानच्या खेळाडूंवर दबाव निर्माण केला आहे. परंतु श्रीलंकेचा कर्णधार शनाकाला त्याच्या संघाकडून आणखी चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा आहे. अंतिम सामन्यात श्रीलंकेचे वेगवान गोलंदाज त्यांची लाईन आणि लेंथ आणखी चांगली करू शकतात, ज्यामुळे संघाला सुरुवातीला विकेट्स मिळतील.
श्रीलंकेचा कर्णधार म्हणाला की, “असे निकाल नेहमीच आम्हाला स्विकाहार्य राहिले आहेत. आमच्याकडे डावखुऱ्या वेगवान गोलंदाज, लेग स्पिनर्स यांचे चांगले संयोजन आहे. आमच्याकडे जी विविधता आहे, ती अद्भुत आहे. मला वाटते की, या खेळात अधिकच्या धावा देणे हा चिंतेचा विषय ठरू शकतो. पाकिस्तानविरुद्ध आमच्या वेगवान गोलंदाजानी जास्तीच्या धावा दिल्या. या क्षेत्रात आम्हाला सुधारणा कराव्या लागणार आहेत. जर आम्हाला अंतिम सामन्यात लवकर विकेट्स मिळाल्या, तर ते आमच्यासाठी फायदेशीर ठरेल.”
श्रीलंका आणि पाकिस्तान संघ आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचले आहेत. अंतिम सामन्यापूर्वी उभय संघांत शेवटचा सुपर-4 सामना झाल्याने त्यांना एकप्रकारे सरावाची संधी मिळाली आहे. आता 11 सप्टेंबरला दुबईत अंतिम सामना होणार आहे. या सामन्यात कोण विजयी होतो? हे पाहाणे रोमांचक ठरेल.
महत्वाच्या बातम्या-
जायचे होते सैन्यात पण गाजवतोय क्रिकेटचे मैदान, वाचा मनीष पांडेचा क्रिकेट प्रवास
‘बारा गावचं पाणी’ पिणारा ‘हा’ दिग्गज क्रिकेटपटू पहिल्यांदाच खेळणार ग्रीनपार्कवर; सचिन अव्वलस्थानी
भारतीय वंशाचे इंग्लंडचे मातब्बर क्रिकेटर, ज्यांच्या नावे सुरू झाली ‘रणजी ट्रॉफी स्पर्धा’, वाचा त्यांच्याबद्दल






