---Advertisement---

डेव्हिड वॉर्नर ‘या’ लीगमध्ये भूषवणार कर्णधारपद! रिकी पाँटिंगबाबतही मोठी घोषणा

On: मंगळवार, सप्टेंबर 8, 2026 7:54 PM
---Advertisement---

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्सचा( World Championship of Legends) तिसरा हंगाम 3 ऑक्टोबरपासून सुरू होत असून, या स्पर्धेत डेव्हिड वॉर्नरची (David Warner) ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्सच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या संघाची सह-मालकी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगकडे (Ricky ponting) आहे. तिसरा हंगाम सुरू होण्यासाठी आता जवळपास एक महिना बाकी आहे. हा WCLच्या इतिहासातील सर्वात मोठा हंगाम असल्याचे सांगितले जात आहे.

मंगळवारी मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्सच्या नव्या ब्रँडिंगचे अधिकृतपणे सर्वांसमोर अनावरण करण्यात आले. WCL 3 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबरदरम्यान UAEमध्ये खेळवली जाणार आहे.

रिकी पाँटिंग आजपर्यंत वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्समध्ये खेळाडू म्हणून खेळलेले नाहीत. मात्र, संघाचे मालक म्हणून त्यांच्या सहभागामुळे लीग म्हणून WCLचा दर्जा आणि लोकप्रियता वाढली आहे. रिकी पाँटिंगसोबतच डेव्हिड वॉर्नरनेही आगामी लीगबद्दल उत्साह व्यक्त केला आहे.

डेव्हिड वॉर्नर यापूर्वी कधीही वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्समध्ये खेळलेला नाही. मात्र, पहिल्याच हंगामात तो ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. संघाचे कर्णधारपद मिळाल्यानंतर वॉर्नर म्हणाला, “WCLच्या तिसऱ्या हंगामात ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्सचे नेतृत्व करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. महान खेळाडूंसोबत पुन्हा मैदानावर उतरण्यापेक्षा आणि चाहत्यांना सेलिब्रेशन करण्यासाठी काही संस्मरणीय क्षण देण्यापेक्षा चांगली गोष्ट आणखी काय असू शकते?”

ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्सचा सह-मालक पुनीत यानेही या आगामी प्रकल्पाबद्दल आनंद व्यक्त केला. त्याने सांगितले की, ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्ससाठी ही एक नवी सुरुवात आहे. रिकी पाँटिंग आणि डेव्हिड वॉर्नर यांचे संघाशी जोडले जाणे हा स्वतःमध्येच एक खास अनुभव असेल, असेही त्याने म्हटले.

WCL 3मध्ये यावेळी याआधीपेक्षा अधिक दिग्गज खेळाडू खेळताना दिसणार आहेत. या लीगमध्ये शाहिद आफ्रिदी, युवराज सिंग, डेव्हिड वॉर्नर, एबी डिव्हिलियर्स, मोईन अली, मोहम्मद महमूदुल्लाह आणि ड्वेन ब्राव्हो हे खेळताना दिसतील. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेले क्रिकेटपटू खेळतात.

आतापर्यंत भारत आणि दक्षिण आफ्रिकेने (India and South Africa) वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्सचे विजेतेपद जिंकले आहे. पहिल्या हंगामाच्या अंतिम सामन्यात इंडिया चॅम्पियन्सने पाकिस्तान चॅम्पियन्सचा 5 विकेट्सने पराभव करून विजेतेपद पटकावले होते. दुसऱ्या हंगामाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्सने पाकिस्तान चॅम्पियन्सचा 9 विकेट्सने पराभव केला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---