ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरनं गेल्या महिन्यात खेळल्या गेलेल्या टी20 विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र, वॉर्नर आता आपला विचार बदलण्याच्या तयारीत आहे.
डेव्हिड वॉर्नरनं सोमवारी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्यानं त्याच्या कुटुंबाचं तसेच त्याच्या प्रवासात त्याला साथ देणाऱ्या सर्व लोकांचं आभार मानलं. त्यानं फ्रँचायझी क्रिकेट खेळत राहणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियन संघात त्याचा समावेश झाल्यास तो त्यासाठी उपलब्ध असेल, असंही डेव्हिड वॉर्नरनं म्हटलं आहे.
डेव्हिड वॉर्नरनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ऑस्ट्रेलियन संघाचं प्रतिनिधित्व करणं ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. वॉर्नरनं चाहत्यांना एक संदेशही दिला आणि त्याला पाठिंबा दिल्याबद्दल सहकाऱ्यांचं आभार मानलं. वॉर्नर म्हणाला, “एक अध्याय संपला!! इतके दिवस सर्वोच्च स्तरावर खेळणं हा एक अविश्वसनीय अनुभव आहे. ऑस्ट्रेलिया माझा संघ होता. माझी बहुतेक कारकीर्द आंतरराष्ट्रीय स्तरावरची आहे. हे करू शकलो हा माझ्यासाठी सन्मान आहे. सर्व फॉरमॅटमध्ये 100 हून अधिक सामने खेळणं हे माझ्या कारकिर्दीचं वैशिष्ट्य आहे. ज्यांच्यामुळे हे शक्य झालं, त्या प्रत्येकाचं मी आभार मानू इच्छितो. माझी पत्नी आणि माझ्या मुली, ज्यांनी खूप बलिदान दिलं, त्यांच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद.”
डेव्हिड वॉर्नर पुढे म्हणाला, “मला आशा आहे की मी सर्व क्रिकेट चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. विशेषत: कसोटीमध्ये, जिथे आम्ही इतरांपेक्षा वेगानं धावा केल्या. आम्हाला जे आवडतं ते आम्ही चाहत्यांशिवाय करू शकत नाही, म्हणून धन्यवाद. मी काही काळ फ्रँचायझी क्रिकेट खेळत राहीन आणि माझी निवड झाल्यास मी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाकडून खेळण्यासही तयार आहे.”
37 वर्षीय डेव्हिड वॉर्नरनं 2009 मध्ये ऑस्ट्रेलियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानं कांगारुंसाठी 112 कसोटी, 161 एकदिवसीय आणि 110 टी20 सामने खेळले आहेत. कसोटीत त्यानं 8786 धावा, एकदिवसीयमध्ये 6932 धावा आणि टी20 क्रिकेटमध्ये 3277 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघाचं नेतृत्व कोण करणार? या 2 खेळाडूंची नावं चर्चेत
लाखो चाहत्यांचा हार्ट ब्रेक! स्मृति मंधानानं केला आपल्या बॉयफ्रेंडचा खुलासा, 5 वर्षांपासून आहेत दोघे एकत्र
किलर यॉर्कर… बुमराह इतकाच घातक! या खतरनाक गोलंदाजाला टीम इंडियात गेल्या 3 वर्षांपासून संधी मिळत नाहीये