संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (१४ नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या संघांदरम्यान दुबई येथील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यातून क्रिकेट जगताला नवा टी२० विश्वचषक विजेता मिळेल. तसेच या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याला भारतीय कर्णधार विराट कोहली याचा मागील सात वर्षांपासून अबाधित असलेला एक मोठा विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी असेल.
तुफान फॉर्ममध्ये आहे वॉर्नर
ऑस्ट्रेलियासाठी त्यांचा अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर हा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच संपलेल्या आयपीएलच्या हंगामात तो सपशेल अपयशी ठरला होता. त्यानंतर त्याची संघातून गच्छंती करण्यात आलेली. मात्र, विश्वचषक सुरू झाल्यानंतर तो पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आला. त्याने स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत सहा सामन्यात २३६ धावा बनविल्या आहेत. तो या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर असून, पहिल्या तीन क्रमांकावरील पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, सलामीवीर मोहम्मद रिजवान व इंग्लंडचा सलामीवीर जोस बटलर हे स्पर्धेतून बाहेर झाले आहेत. या सामन्यात ६८ धावा काढून तो त्यांच्या पुढे जाऊ शकतो. तसेच त्याला या सामन्यात ८४ धावांची खेळी करून भारतीय कर्णधार विराट कोहलीचा एक विक्रम मोडण्याची संधी असेल.
विराटच्या नावे स्पर्धेतील विक्रम
टी२० विश्वचषकाच्या एका स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम भारताच्या विराट कोहलीच्या नाववर आहे. त्याने २०१४ मध्ये बांगलादेश येथे झालेल्या स्पर्धेत ३१९ धावा केल्या होत्या. वॉर्नरने अंतिम सामन्यात ८४ धावांची खेळी केल्यास तो हा विक्रम आपल्या नावावर करू शकतो.
अंतिम सामन्यात भिडणार शेजारी
दुबई येथे होणाऱ्या या अंतिम सामन्यात शेजारी राष्ट्र असलेले ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे संघ समोरासमोर येतील. अत्यंत रोमांचक झालेल्या उपांत्य सामन्यांमध्ये या दोन्ही संघानी विजय मिळवून अंतिम फेरी गाठली आहे. दोन्ही संघांकडे प्रथमच टी२० विश्वचषक उंचावण्याची संधी असेल. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप पाठोपाठ टी२० विश्वचषक जिंकण्याचा न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनचा मानस असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘तोपर्यंत मी संघाच्या आठवणी जपत राहील’, विराटसेनेला सोडताना माजी प्रशिक्षक शास्त्री झाले भावुक
Video: ‘द ग्रेट’ खलीने फुटबॉलने खेळले क्रिकेट; चाहते म्हणाले, ‘आभाळाला छिद्र पडेल’
Video: ‘द ग्रेट’ खलीने फुटबॉलने खेळले क्रिकेट; चाहते म्हणाले, ‘आभाळाला छिद्र पडेल’