ऑस्ट्रेलियाचा माजी स्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नरला बिग बॅश लीगमध्ये कर्णधारपद मिळालं आहे. डेव्हिड वॉर्नर बीबीएल 2024-25 मध्ये सिडनी थंडर संघाचं नेतृत्व करताना दिसेल. सिडनीनं आगामी हंगामासाठी वॉर्नरची कर्णधार म्हणून निवड केली आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियानं सुमारे सहा वर्षांपूर्वी 2018 मध्ये डेव्हिड वॉर्नरवर कर्णधारपदाची आजीवन बंदी घातली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊन कसोटीत वॉर्नर बॉल टॅम्परिंगप्रकरणी दोषी आढळल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियानं त्याला ही शिक्षा दिली होती. वॉर्नरनं अलीकडेच कर्णधारपदावरील बंदीविरोधात अपील केले होतं. त्यानं आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. अशा परिस्थितीत क्रिकेट ऑस्ट्रेलियानं त्याच्यावरील बंदी संपवली. बंदी संपल्यानंतर सिडनी थंडरनं वॉर्नरला कर्णधार म्हणून घोषित केलं.
सिडनी थंडरचं कर्णधारपद मिळाल्यावर डेव्हिड वॉर्नर म्हणाला, “पुन्हा एकदा कर्णधारपद मिळणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मी सुरुवातीपासून या संघाचा एक भाग आहे. आता संघात कर्णधार म्हणून पुनरागमन करणं माझ्यासाठी खूप चांगलं आहे.”
बीबीएल 2024-25 साठी सिडनी थंडर संघ – डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), वेस अगर, कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट, सॅम बिलिंग्ज, ऑलिव्हर डेव्हिस, लॉकी फर्ग्युसन, मॅट गिल्केस, ख्रिस ग्रीन, लियाम हॅचर, सॅम कोन्स्टास, निक मॅडिसन, नॅथन मॅकअँड्र्यू, शारफान रदरफोर्ड, विल्यम साल्झमन, डॅनियल सॅम्स, जेसन सांगा आणि तन्वीर सांगा
डेव्हिड वॉर्नरनं 2023 एकदिवसीय विश्वचषकानंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. यानंतर त्यानं 2024 टी20 विश्वचषकानंतर टी20 आंतरराष्ट्रीय मधूनही निवृत्ती घेतली. वॉर्नरने या वर्षी जानेवारीत शेवटची कसोटी खेळली होती. आता त्यानं 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी, ऑस्ट्रेलियन संघाच्या मुख्य निवडकर्त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की तो आता त्यांच्या योजनांचा भाग नाही.
हेही वाचा –
रिकी पाँटिंगची भविष्यवाणी! बॉर्डर-गावस्कर मालिकेत हा भारतीय खेळाडू करेल सर्वाधिक धावा
“रोहित शर्मा म्हातारा होतोय, त्यानं निवृत्ती…”, भारतीय दिग्गजाचं मोठं वक्तव्य
भारतानं 2036 ऑलिम्पिकसाठी ठोकला दावा, गुजरातमधील या शहराला मिळू शकतं यजमानपद