आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ चा दुसरा उपांत्य सामना गुरुवारी (११ नोव्हेंबर) दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने चांगली कामगिरी करत पाकिस्तान संघाचा एक षटक आणि पाच गडी राखून पराभव केला. या उपांत्य सामन्यात, ऑस्ट्रेलियाचा 35 वर्षीय अनुभवी सलामीवीर डेविड वॉर्नर जबरदस्त लयीत दिसला.
सामन्यादरम्यान, ऑस्ट्रेलियाचे फलंदाज सुरुवातीच्या षटकांमध्ये पाकिस्तानी गोलंदाजांचा सामना करण्यास असमर्थ वाटत होते. पण, यावेळी ऑस्ट्रेलियाचा वॉर्नरने एक टोक लावून धरले आणि जबरदस्त फलंदाजी करत ३० चेंडूत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ४९ धावा केल्या. पण, आपल्या खेळीत डेविड वॉर्नरने मोठी चूक केली, जी ऑस्ट्रेलिया संघाला खूप महागात पडली असती.
सामन्यादरम्यान, वॉर्नरला त्याच्या टी२० क्रिकेट कारकिर्दीतील २१ वे अर्धशतक पूर्ण करण्याची सुवर्ण संधी होती, परंतु, तो ते साध्य करू शकला नाही. तो शादाब खानच्या गोलंदाजीवर दुर्दैवीपणे बाद झाला. ज्या चेंडूवर वॉर्नरला पंचांनी त्याला बाद दिले, तो चेंडू त्याच्या बॅटला लागलाच नव्हता. त्याने रिव्ह्यू घेतला असता तर निकाल त्याच्या बाजूने लागला असता, पण डेविड वॉर्नरने चूक केली. त्याने रिव्ह्यू बाकी असतानाही घेतलाच नाही. परिणामी, त्याला बाद नसतानाही पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तान संघाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १७७ धावांचे लक्ष्य दिले होते. त्याचवेळी ऑस्ट्रेलिया संघाने हे लक्ष्य १९ षटकांत पाच गडी गमावून पूर्ण केले. सामन्यादरम्यान वॉर्नरशिवाय मार्कस स्टॉयनिस आणि मॅथ्यू वेडही जबरदस्त लयीत दिसले. स्टॉयनिसने ३१ चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद ४० धावा केल्या, तर वेडने केवळ १७ चेंडूंत दोन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद ४१ धावांची मौल्यवान खेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या –
मॅथ्यू वेड म्हणतोय, ‘हसन अलीने जरी झेल घेतला असता, तरी आम्ही जिंकलोच असतो’
पुढीलवर्षी विश्वचषकापूर्वी भारतीय संघ करणार न्यूझीलंड दौरा, असे आहे वेळापत्रक
मॅक्सवेल ज्या पाकिस्तानी गोलंदाजाचा चाहता, त्याच्यासोबत सेमीफायननंतर बदलली जर्सी, पाहा फोटो