रविवारी (३ ऑक्टोबर) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना पार पडला. सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने सहा विकेट्स राखून विजय मिळवला. हैदराबादचा माजी कर्णधार डेविड वार्नर आयपीएलच्या चालू हंगामात काही खास प्रदर्शन करू शकला नाही. याच पार्श्वभूमीवर त्याला संघातून बाहेर ठेवले गेले आहे आणि काल पार पडलेल्या केकेआरविरुद्धच्या सामन्यातही त्याला संधी मिळाली नाही. दरम्यन, वार्ननने प्रेक्षकांच्या स्टॅन्ड्समध्ये बसून या सामन्याचा आनंद घेतला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
संपूर्ण हंगामात केली खराब कामगिरी
वार्नरचे या हंगामातील प्रदर्शन खूपच खराब राहीले आहे. त्याने या हंगामात ८ सामने खेळले आहेत आणि यामध्ये १०७.७३ च्या स्ट्राइक रेटने १९५ धावा केल्या आहेत. हंगामात त्याने केवळ दोन वेळा अर्धशतकी खेळी केली आहे. त्याच्या या खराब प्रदर्शनामुळे त्याला हैदराबादच्या कर्णधारपदावरू पायउतार व्हावे लागले होते. वार्नरच्या जागेवर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनला हैदराबादच्या कर्णधारपदाची जबाबदारी दिली गेली. विलियम्सनला कर्णधार केल्यावर संघाच्या प्रदर्शनात सुधारणा होईल अशी अपेक्षा होती, पण तसे काहीच दिसले नाही.
संघाला दिला प्रेक्षकातून पाठिंबा
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत वार्नर स्टॅन्ड्समधून सामन्याचा आनंद घेत हैदराबादचा झेंडा फडकवताना दिसत आहे. चाहत्यांना वार्नरचा हा अंदाज खूपच आवडला असून, ते या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडिओव्यतिरिक्त वार्नरने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरू स्टॅन्ड्समधून सामन्याचा आनंद घेत असतानाचा एक सेल्फीही शेअर केला आहे. त्याचा हा सेल्फीही चाहत्यांना चांगलाच आवडला आहे.
https://twitter.com/_itz__pravin/status/1444700169694375941?s=19
हैदराबाद पुन्हा पराभूत
दरम्यान, सामन्यात सुरुवातीला हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हैदराबादची फलंदाजी पाहता कर्णधाराने घेतलेला निर्णय चुकीचा ठरल्याचे दिसले. हैदराबादने २० षटकात ८ विकेट्स गमावले आणि अवघ्या ११५ धावा केल्या. प्रत्युत्तरात केकेआरने १९.४ षटकात ४ विकेट्सच्या नुकसानावर हे लक्ष्य गाठले आणि सामन्यात विजय मिळवला. केकेआरच्या शुबमन गिलने ५१ चेंडूत ५७ धावांची महत्वाची खेळी केली. सामना संपल्यापर त्यालाच मॅन ऑफ दे मॅच निवडले गेले.