इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत सोमवारी (२७ सप्टेंबर) सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने राजस्थान रॉयल्स संघाला ७ गडी राखून पराभूत करत स्पर्धेतील दुसरा विजय मिळवला.परंतु सामना सुरू होण्यापूर्वीच क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. हैदराबाद संघातील विस्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नरला या संघातून बाहेर करण्यात आले होते. ज्यामुळे चाहते भलतेच निराश झाले होते. दरम्यान सामना झाल्यानंतर त्याचे एक ट्विट प्रचंड व्हायरल होत आहे. जे पाहून तो पुन्हा कधीच सनरायझर्स हैदराबाद संघासाठी खेळताना दिसणार नाही असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
डेव्हिड वॉर्नर हा सनरायझर्स हैदराबाद संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएल स्पर्धेचे जेतेपद मिळवले होते. तर ३ वेळेस हा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला होता. परंतु, आयपीएल २०२१ स्पर्धेत डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. ज्यामुळे त्याला कर्णधार पदावरून काढून टाकण्यात आले होते. इतकेच नव्हे तर फलंदाजीमध्ये फ्लॉप ठरत असल्यामुळे त्याला २ वेळेस प्लेइंग इलेव्हन बाहेर ठेवण्यात आले होते.
त्यामुळे चाहते देखील असा अंदाज व्यक्त करत आहेत की, हा डेव्हिड वॉर्नरचा सनरायझर्स हैदराबाद संघासाठी शेवटचा हंगाम असेल. एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, “येणाऱ्या वर्षात खेळाडूंचा लिलाव होणार आहे. सर्व संघ एक नवीन सुरुवात करण्याच्या प्रयत्नात असणार आहेत. सनरायझर्स हैदराबाद संघाने गेल्या २ हंगामात निराशाजनक कामगिरी केली आहे. मग आम्हाला नवीन सुरुवात करायला नको का? डेव्हिड वॉर्नरने सनरायझर्स हैदराबाद संघासाठी खूप चांगली कामगिरी केली आहे. परंतु आता वेळ आली आहे नवीन सुरुवात करण्याची.” यावरून स्पष्ट होत आहे की, डेव्हिड वॉर्नरला आगामी हंगामात रिलीज केले जाणार आहे.
ते ट्विट व्हायरल
राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात डेव्हिड वॉर्नरला संघात स्थान देण्यात आले नव्हते. इतकेच नव्हे तर तो स्टेडियममध्ये देखील उपस्थित नव्हता. त्यांनतर एका चाहत्याने ट्विट केले होते की, “वॉर्नर स्टेडियममध्ये आहे का? आम्हाला तो दिसत नाहीये.” तर आणखी एका चाहत्याने ट्विट करत लिहिले की, “डेविड… मला खूप रडू येत आहे. काही वेळ विश्रांती कर आणि जोरदार पुनरागमन कर.” हे ट्विट पाहून डेव्हिड वॉर्नर भावुक झाला आणि त्याने लिहिले की, “दुर्दैवाने असे पुन्हा होणार नाही पण मला असाच पाठिंबा देत रहा.”
कर्णधारपदावरून झाली होती गच्छंती
आयपीएल २०२१ स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात डेव्हिड वॉर्नरला कर्णधार पदावरून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर केन विलियमसनला संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. असे म्हटले गेले होते की, डेव्हिड वॉर्नर आणि संघ व्यवस्थापकांमध्ये मतभेद निर्माण झाले होते.ज्यामुळे सनरायझर्स संघाने हा मोठा निर्णय घेतला होता.