सोमवारी (२७ सप्टेंबर) इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमने सामने होते. या रोमांचक सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने राजस्थान रॉयल्स संघाला ७ गडी राखून पराभूत करत आयपीएल २०२१ स्पर्धेतील दुसरा विजय मिळवला. या सामन्यासाठी हैदराबादने संघात काही बदल केले होते. संघातील सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नरला या सामन्यातून वगळण्यात आले होते. परंतु या सामन्यादरम्यान त्याने आपल्या एका कृतीने सर्वांची मने जिंकली आहेत.
सनरायझर्स हैदराबाद संघाला आयपीएल २०२१ स्पर्धेत साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. हा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्स संघाने आपल्या संघात मोठे बदल केले होते. सर्वात मोठा बदल म्हणजे वॉर्नरला संघाबाहेर करून जेसन रॉयला संघात स्थान देण्यात आले होते. राजस्थान रॉयल्सने दिलेल्या १६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जेसन रॉयने तुफान फटकेबाजी केली. त्याने ४२ चेंडूंमध्ये ८ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ६० धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबाद संघाने ७ गडी राखून विजय मिळवला.
सनरायझर्स हैदराबाद संघासाठी पदार्पण करत असलेल्या जेसन रॉयला या खेळीमुळे सामनावीर पुरस्कार देण्यात आला. आपल्या जागी संधी मिळालेल्या या खेळाडूने दिलेल्या योगदानाल पाहून वॉर्नर देखील भलताच खुश झाला. वॉर्नर या सामन्यावेळी स्टेडियममध्ये उपस्थित नव्हता. पण तो हॉटेलच्या रूममधून जेसन रॉयला चीयर करत होता.
त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या स्टोरीवरून याची माहिती मिळते. ज्यामध्ये त्याने जेसन रॉयच्या खेळीचे तोंडभरून कौतुक केले आहे. गेल्या सामन्यात स्वस्तात माघारी परतल्यामुळे वॉर्नर ऐवजी जेसन रॉयला राजस्थान विरुद्ध संधी देण्यात आली होती.
या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्स संघाकडून कर्णधार संजू सॅमसनने सर्वाधिक ८२ धावांची खेळी केली. तर यशस्वी जयस्वालने ३६ धावांचे बहुमूल्य योगदान दिले होते. या खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्स संघाला २० षटक अखेर ५ बाद १६४ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना जेसन रॉयने सर्वाधिक ६० धावांची खेळी केली होती. तर केन विलीयमसनने नाबाद ५१ आणि अभिषेक शर्माने नाबाद २१ धावांची खेळी करत सनरायझर्स हैदराबाद संघाला हा सामना ७ गडी राखून जिंकून दिला.
महत्वाच्या बातम्या –
Video: केवळ १८ धावांची खेळी केली, पण साहाने त्याच्या ८३ मीटरच्या षटकाराने मिळवली सर्वांची वाहवा
सनरायझर्सच्या विजयाचा नायक ठरलेल्या रॉयची सामनावीर ठरल्यानंतर भावुक प्रतिक्रिया, म्हणाला…
सनरायझर्सने तोडले वॉर्नरसोबतचे नाते! स्वतः दिली माहिती, उर्वरित आयपीएलमध्ये खेळण्याची शक्यता धूसर