पुणे । अद्भूत, अद्वितीय, संस्मरणीय,ऐतिहासिक… जी अपेक्षा होती त्यापेक्षा भव्य-दिव्य आणि दिमाखदार झालेल्या मि. इंडियाच्या प्राथमिक फेरीत 584 पैकी पीळदार आणि दमदार 100 खेळाडूंची अंतिम फेरी गाठली आहे.
भारतीय शरीरसौष्ठवाची ताकद दाखवणाऱया या सोहळ्यात भारत श्री किताबासाठी सलग दोनवेळा भारत श्रीचा मान मिळविणाऱया सुनीत जाधवसमोर आपले जेतेपद राखण्याचे कडवे आव्हान आहे.
जबरदस्त तयारीत असलेल्या रामनिवास, जावेद खान, महेंद्र पगडे, अनुज छेत्री यांच्यात स्पर्धा इतकी तगडी आहे की भारतीय शरीरसौष्ठवाचा बाहुबली कोण याचा अंदाज बांधणेही कठिण आहे. त्यामुळे रविवारी रंगणाऱया ब्लॉकबस्टर पोझयुद्धानंतरच भारत श्रीचा फैसला लागेल.
शरीरसौष्ठव स्पर्धेच्या इतिहासात आज अनेक विक्रम मोडले गेले. सर्वप्रथम म्हणजे विक्रमी 584शरीरसौष्ठवपटूंच्या सहभागामुळे बालेवाडीच नव्हे तर संपूर्ण परिसराचे वातावरण छाती फुगल्यासारखे झाले होते.
विक्रमी स्पर्धकानंतर प्राथमिक फेरीलाच कधी नव्हे ती प्रेक्षकांचीही अभूतपूर्व गर्दी लाभली. शरीरसौष्ठवाची खरी ताकद प्राथमिक फेरीतच दिसते. सहाशेच्या आसपास आलेल्या भारदस्त आणि पीळदार खेळाडूंना पाहण्याची संधी प्राथमिक फेरीतच मिळते.
त्यामुळे हाडाच्या शरीरसौष्ठवप्रेमींनी प्राथमिक फेरीला मोठ्या संख्येने गर्दी केली होती. प्रेक्षकांच्या अभूतपूर्व गर्दी सुरू झालेल्या शरीरसौष्ठवाच्या पोझयुद्धात प्रत्येक गटातून टॉप टेनची नावे काढताना पंचांना अक्षरशा घाम फुटला.
पुरूषांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेप्रमाणे महिलांच्या शरीरसौष्ठव गटात दहा, महिलांच्या फिजीक स्पोर्टस् गटात 35 आणि पुरूषांच्या फिजीक स्पोर्टस् गटात विक्रमी 92 खेळाडूंना सहभाग नोंदवून इतिहास रचला.
स्पर्धेच्या प्रत्येक गटात 35 ते 40 शरीरसौष्ठवपटू आणि तेसुद्धा पीळदार, त्यामुळे जजेसनी आधी 15 खेळाडूंची निवड केली आणि त्यांच्याकडून दोन वेळा सात पोझेस मारून घेत अंतिम फेरीसाठी टॉप टेनची निवड केली.
55किलो वजनी गटाच्या पहिल्याच गटात टॉप टेनसाठी पंधरा नव्हे तर 25 खेळाडू दावेदार होते. त्यामुळे 35खेळाडूंमधून दहा निवडताना जजेसला फार डोकेफोड करावी लागली.
पहिल्या गटातून अंतिम फेरीसाठी महाराष्ट्राचे संदेश सकपाळ आणि नितीन शिगवण पात्र ठरणार हे नक्की होते आणि तसे झालेही. त्यांना या गटात रेल्वेच्या जे.जे. चक्रवर्ती, पुंदन गोपे तसेच तामीळनाडूच्या आर.बालाजी आणि रामामुर्ती यांच्याकडून कडवी टक्कर मिळणार आहे.
60 किलो वजनी गटातही 55 किलो वजनी गटासारखीच परिस्थिती होती. 36 खेळाडूंमधून मि.वर्ल्ड नितीन म्हात्रे,प्रतिक पांचाळ या महाराष्ट्रांच्या शिलेदारांची टॉप टेनसाठी निवड करण्यात आली. तसेच या गटात तोंबा सिंग, एम राजू या तेलंगणाच्या खेळाडूंसह रेल्वेचा हरिबाबू,आसामचा दीपू दत्ताही पात्र ठरले आहे.
65 किलो वजनी गटात खेळाडूंच्या संख्येने पन्नाशी गाठली होती. डोळे दिपवणाऱया या गटात मित्तल कुमार,एस विष्णू, श्रीनिवास वास्के, एस. भास्करन, अनिल गोचीकर, रोशनकांता सिंग यांचे देहभान विसरायला लावणारे सौष्ठव पाहून प्रेक्षकच नव्हे तर पंचही भारावले.
70 किलो वजनी गटात 47 खेळाडूंमधून दहा हिरे निवडताना पंचांना आपले कौशल्य पणाला लावायला लागले. या गटात महाराष्ट्राच्या रितेश नाईकला हरयाणाच्या अंकूर वर्माशी भिडावे लागणार आहे. या गटातही मि.वर्ल्ड हिरालालला भारत श्रीचे गटविजेतेपद पटकावण्यासाठी राजू खान, सुशीलकुमार सिंग, सुवदीप बैद्यशी गटविजेतपदासाठी काँटे की लढत द्यावी लागणार आहे.
75 किलो वजनी गटात व्ही. जयप्रकाश, पवन कुमार, जीतु गोगई, दीपक रावत, प्रमोद मैतेई आणि व्ही राजीव यांच्यात चुरस रंगण्याची शक्यता आहे. 80 किलो वजनीगटात महाराष्ट्राच्या सागर कातुर्डेला बी.महेश्वरन,सर्बो सिंग, इ कार्तिक, हरीराम यांच्याशी गटात अव्वल स्थान पटकावण्यासाठी लढावे लागणार आहे.
85 किलो वजनी गटातही 42 खेळाडू असल्यामुळे टॉप टेन निवडताना फार संघर्ष पाहायला मिळाला. मुंबई श्री विजेता सुजन पिळणकर, प्रीतम चौगुले, अजय नायर,बॉबी सिंग यांच्यातच गटविजेतेपदासाठी चकमक उडणार हेसुद्धा नक्की आहे.
स्पर्धेचा विजेता ज्या गटात खेळत आहे, असा गट म्हणजे90 किलो वजनी गट. या गटात सुनीतसह महाराष्ट्राचा महेंद्र चव्हाण,रेल्वेचा सागर जाधव, उत्तर प्रदेशचा विजय बहादूर हे दिग्गज आहेत.
तसेच मणिपूरचा रिशीकांता सिंग आणि तामीळनाडूचा मोहन सुब्रमण्यम हेसुद्धा चांगल्या तयारीत असल्यामुळे हेच अंतिम फेरीतही एकमेकांसमोर आव्हान उभे ठाकताना दिसतील. स्पर्धेचा सर्वात खतरनाक गट म्हणजे 95 किलो वजनी गट.
यात स्पर्धेचे संभाव्य विजेते एकाच खेळताना दिसतील. महाराष्ट्राच्या महेंद्र पगडे आणि राम निवासला उत्तराखंडच्या अमित छेत्री आणि सीआरपीएफच्या प्रीतमचे कडवे आव्हान परतावे लागणार आहे. हा गट सर्वांच्या हृदयांचे ठोके चुकवणारा ठरेल आणि जो गटविजेता ठरेल तोच मि.इंडियाचे जेतेपदही जिंकेल,असा अंदाज शरीरसौष्ठव तज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.
सर्वात शेवटच्या गटात रेल्वेचे जेतेपद पटकावणारा जावेद अली खान हासुद्धा भारत श्रीचा दावेदार असल्यामुळे उत्तर प्रदेशचा अनुज कुमार, महाराष्ट्राचा अतुल आंब्रे, अक्षय मोगरकर यांच्यापैकी कोण गटविजेता ठरतो हे उद्याच कळू शकेल. प्रत्येक गट चुरशीचा असल्यामुळे चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स नक्की कोण होईल, हे कुणीही सांगू शकत नव्हता. फक्त ज्याचा दिवस असेल तोच ब्लॉकबस्टर सोहळ्यात जेतेपद पटकावेल.