भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघातील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगला आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने न्यूझीलंडवर वर्चस्व गाजवले. मुंबई कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दुसऱ्या दिवसाअखेर न्यूझीलंडची धावसंख्या 9 गडी बाद 171 धावा आहे. न्यूझीलंडकडे 143 धावांची आघाडी आहे. न्यूझीलंडकडून एजाज पटेल आणि विल्यम ओरुके नाबाद आहेत.
भारताचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) हा भारतासाठी तिसऱ्या कसोटीच आतापर्यंतचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. रवींद्र जडेजाला दुसऱ्या दिवशी 4 विकेट्स मिळाल्या, तर रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) 3 फलंदाज बाद केले. आकाश दीप (Akash Deep), वॉशिंग्टन सुंदरने (Washington Sundar) 1-1 विकेट घेतली. दुसऱ्या दिवशी दोन्ही संघांचे 15 फलंदाज बाद होऊन तंबूत परतले.
दुसऱ्या दिवशी ज्यावेळी भारतीय संघ फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता, त्यावेळी भारताची धावसंख्या 84 धावा 4 बाद अशी होती. त्यावेळी भारतासाठी शुबमन गिल (Shubman Gill) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) यांनी 96 धावांची भागीदारी रचली, मात्र त्यानंतर भारतीय संघ 263 धावांवर बाद झाला.
पंत 59 चेंडूत 60 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 8 चौकारांसह 2 षटकार ठोकले. तर गिलने 146 चेंडूत 90 धावा केल्या. दरम्यान त्याने 7 चौकारासंह 1 षटकार ठोकला. यानंतर सरफराज खान (Sarfaraz Khan) शून्यावर तंबूत परतला. जडेजाने 14 धावा केल्या, तर अश्विनने 6 धावांचे योगदान दिले. आकाश दीप शून्यावर बाद झाला. मात्र, वॉशिंग्टन सुंदरने नाबाद 38 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. दरम्यान त्याने 4 चौकारांसह 2 उत्तुंग षटकार ठोकले.
न्यूझीलंडसाठी एजाज पटेल (Ajaz Patel) हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. पटेलने 5 विकेट्स घेतल्या. याशिवाय मॅट हेन्री, ग्लेन फिलिप्स आणि ईश सोढीने प्रत्येकी 1-1 विकेट्स घेतली. आता तिसऱ्या दिवशी दोन्ही संघातील ही लढत रोमांचक पाहायला मिळण्याची शक्यता आहे, तर भारतीय संघ या मालिकेतील पहिला सामना जिंकण्यात यशस्वी ठरतो का? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
वयाच्या 25व्या वर्षापर्यंत सर्वाधिक वेळा 90 धावांच्या जाळ्यात फसले ‘हे’ 5 भारतीय खेळाडू
माजी क्रिकेटरच्या निधनाची खोटी माहिती पसरवल्यानंतर ‘या’ दिग्गजाने मागितली माफी!
इंग्लिश फलंदाजानं घेतला स्टुअर्ट ब्रॉडचा बदला! भारतीय खेळाडूच्या 6 चेंडूवर ठोकले 6 षटकार