मुंबई उपनगर कबड्डी असो.च्या विद्यमाने आयोजित केलेल्या ” मुंबई महापौर चषक कबड्डी स्पर्धेत” महिंद्रा, देना बँक, महाराष्ट्र पोलीस, मुंबई बंदर यांनी पुरुषांत, तर महात्मा गांधी, संघर्ष, शिवशक्ती, मुं. पोलीस यांनी महिलांत उपांत्य फेरी गाठली. काशिलिंग आडकेचा भारत पेट्रोलियम संघ उपउपांत्य फेरीतच गारद झाला.
महिंद्रा वि देना बँक, महाराष्ट्र पोलीस वि मुंबई बंदर अशा पुरुषांत, तर महात्मा गांधी वि संघर्ष, शिवशक्ती वि मुंबई पोलीस अशा महिलांत उपांत्य लढती होतील.
कुर्ला नेहरू नगर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर गर्दी करून उपांत्यपूर्व लढती पहावयास हजर असलेल्या रसिकांना आज पुरुषांच्या चुरशीच्या लढतीने मनमुराद आनंद दिला.
महिलांच्या लढती तशा एकतर्फी झाल्या. शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार झालेल्या पुरुषांच्या उपांत्य पूर्व सामन्यात देना बँकेने युनियन बँकेला ३०-२९असे चकविले.मध्यांतराला १८-१२अशा आघाडी घेणाऱ्या देना बँकेला उत्तरार्धात मात्र युनियन बँकेने विजयासाठी चांगलेच झुंजवले.
शेवटच्या मिनिटात अजिंक्य कापरेची पकड झाली आणि युनियन बँकेच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या.देना बँकेकडून पंकज चव्हाण, महेश वळवी याची चढाईचा, तर सुदेश कुळे,राहुल शिरोडकर यांनी भक्कम बचावाचा खेळ केला.
विशाल कदम, अजिंक्य कापरे, नितीन घोगळे, संतोष वारकरी यांनीं युनियन बँकेला विजय मिळवून देण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कडवी झुंज दिली. पण विजयाने त्यांना हुलकावणी दिली. महिंद्राने मुंबई पोलिसांचा प्रतिकार ३६-२६असा संपविला.
विश्रांतीला २०-१०अशी मजबूत आघाडी घेणाऱ्या महिंद्राने नंतर सावध खेळ करीत हा विजय साकारला. आनंद पाटील, सुदाम मंग्रे यांच्या आक्रमक चढाया, तर सुहास वगरे, अभिषेक भोजने यांच्या धाडशी पकडी या विजयात महत्वाच्या ठरल्या.
संकेत धुमाळ, जितेंद्र पाटील, दिनेश परब यांचा खेळ पोलीस संघाला विजय मिळवून देण्यात कमी पडला.
मुंबई बंदरने आज कमाल केली. त्यांनी भारत पेट्रोलियम या बलाढ्य संघाला ३७-२५ अशी धूळ चारत कबड्डी वर्तुळात खळबळ उडवून दिली. मुंबई बंदरने सुरुवातच अशी आक्रमक केली की, सातव्या मिनिटाला पेट्रोलीयमवर लोण देत ९-०अशी आघाडी घेतली.
पण भारत पेट्रोलीयमने या लोणची लगोलग परतफेड करीत १०-०९अशी आघाडी घेतली. मुंबई बंदरने पुन्हा दुसरा लोण देत आघाडी घेतली. मध्यांतराला २०-१५अशी आघाडी मुंबई बंदरकडे होती.
त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. मध्यांतरानंतर आणखी एक लोण देत आपल्या विजयावर शिक्का मोर्तब केले. मुंबई बंदरच्या दिपक भिसेने झंजावती चढाया करीत संघाला गुण मिळवून दिले.
त्याला थोपविणे पेट्रोलीयमच्या क्षेत्ररक्षकांना जमले नाही. त्याला शुभम कुंभारने चढाईत, तर अनिल शिंदेने भक्कम बचाव करीत छान साथ दिली. मुंबई बंदरचे क्षेत्ररक्षण आज अतिशय उत्तम झाले.
काशिलिंग आडके, आकाश पिकलमुंडे या पेट्रोलीयमच्या आक्रमक चढाईपट्टूना त्यातून गुण मिळविणे मुश्किल झाले.उलट त्यांच्या पकडी होत गेल्या आणि पेट्रोलीयमवर दबाव वाढत गेला.
त्यांचा बचाव आज दिपक भिसे पुढे दुबळा ठरला. शेवटच्या सामन्यात महाराष्ट्र पोलिसांनी सेंट्रल बँकेचे आव्हान २६-१४असे मोडून काढले. मध्यांतराला १६-०५अशी विजयाच्या दृष्टीने आघाडी घेणाऱ्या पोलिसांनी नंतर सावध खेळ करीत उपांत्य फेरी गाठली. नामदेव इस्वलकर, वैभव कदम या विजयाचे शिल्पकार ठरले.
सुशांत साईल, विनायक मोरे यांनी बँकेकडून बरी लढत दिली.
महिलांच्या उपांत्य पूर्व फेरीत उपनगरच्या संघर्षने कोमल देवकर,कोमल यादव यांच्या चढाया, तर पूजा यादवच्या भक्कम बचावाच्या बळावर रत्नागिरीच्या चिपळूण स्पोर्ट्सचा ३७-११ असा सहज पराभव केला.
पूर्वार्धात जोरदार खेळ करीत संघर्षने प्रतिस्पर्ध्यावर दोन लोण चढवित विश्रांतीला २३-०६अशी आश्वासक आघाडी घेतली. उत्तरार्धात आणखी एक लोण देत आपल्या उपांत्य फेरीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब केले.
चिपळूणच्या श्रद्धा पवारला आज सूर सापडला नाही. अनपेक्षितपणे चिपळूनने साखळी सामन्या पुण्याच्या शिव ओम् चा पराभव केल्याने त्यांनी बाद फेरी गाठली होती. महात्मा गांधीने नवशक्तीचा ४४-०८असा धुव्वा उडविला.
पहिला लोण देताना पूजा किणी हिने एकाच चढाईत ४ गडी टिपले. पूजाने मिनल जाधव, तेजश्री किलबिले, तेजश्री पाटेकर यांच्या साथीने दोन्ही डावात २-२लोण देत संघाचा विजय सोपा केला. नवशक्तीची बेबी जाधव बरी खेळली.
शिवशक्तीने पुण्याच्या एम एच स्पोर्ट्सचा ४०-१९असा पराभव करीत उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले. मध्यांतरापर्यंत सावध खेळ करीत १३-०७ अशी आघाडी घेणाऱ्या शिवशक्तीने नंतर मात्र जोरदार खेळ करीत मोठ्या फरकाने विजय साजरा केला.
ऋतुजा बांदिवडेकर, रेखा सावंत, पूर्णिमा जेधे यांच्या चतुरस्त्र खेळाला या विजयाचे श्रेय जाते. एम एच च्या प्रतीक्षा कारेकर, चैताली कारके यांचा खेळ बरा होता. शेवटच्या सामन्यात मुं. पोलीसने उपनगरच्या स्वराज्यचा २१-१५ असा पाडाव करीत आगेकूच केली.
पोलिसांकडून भक्ती इंदुलकर, शीतल बावडेकर यांनी उत्तम खेळ केला. स्वराज्यची स्मिता पांचाळ एकाकी लढली.
बादफेरीच्या सामन्यांचे निकाल #MayorTrophyKabaddi
पुरुष गट
सेंट्रल बँक 14 वि. महाराष्ट्र पोलिस 26 (विजयी)�
भारत पेट्रोलियम 25 वि. मुंबई बंदर 37 (विजयी)
महिला गट
शिवशक्ती 40 (विजयी) वि. एमएच स्पोर्टस क्लब 19
स्वराज्य 15 वि. मुंबई पोलिस 21 (विजयी) pic.twitter.com/SnSPCxxrs2— Upnagar Kabaddi (@MUKabaddi) March 21, 2018