महिंद्रा, मध्य रेल्वे विभाग, युनियन बँक, सेन्ट्रल बँक, मध्य रेल्वे, देना बँक, पश्चिम रेल्वे यांनी अंकुर स्पोर्ट्स क्लब आणि डॉ.शिरोडकर विचार अमृतधारा यांच्या संयुक्त विद्यमाने व मुं. शहर कबड्डी असो.च्या मान्यतेने आयोजित केलेल्या विशेष व्यावसायिक गट कबड्डी स्पर्धेची बाद फेरी गाठली.
अशोक मंडळ, विजय क्लब, जय दत्तगुरु, विजय बजरंग व्यायाम शाळा, शिवशक्ती, वारसलेन यांनी ५५किलो वजनी गटात उपउपांत्य फेरीत धडक दिली. लालबाग, गणेश गल्ली येथील स्व.अनिल कुपेरकर क्रीडांगणावर झालेल्या व्यावसायिक अ गटात महिंद्राने पी डी हिंदुजाचा प्रतिकार ४५-१२असा सहज मोडून काढला.पहिल्या डावात २७-०८अशी आघाडी घेणाऱ्या महिंद्राने पूर्ण डावात हिंदुजावर ४लोण चढविले.
ओमकार जाधव, शेखर तटकरे यांच्या चढाई-पकडीच्या खेळाला हिंदुजाकडे उत्तरच नव्हते. हिंदुजाचा अमेय शिंदे बरा खेळला
सेन्ट्रल बँकेने माझगाव डॉकला ४३-३६असे पराभूत करीत ब गटातून बाद फेरी गाठली. पहिल्या डावात १९-१२अशी आघाडी घेणाऱ्या बँकेला दुसऱ्या डावात मात्र माझगाव डॉकने चांगलेच जेरीस आणले. एक वेळ अशी होती की, डॉकने बँकेवर लोण देत काही काळ आघाडी देखील घेतली होती.पण बँकेने पुन्हा मुसंडी मारत विजश्री खेचून आणली.
सागर कुऱ्हाडे, रोहित अधटराव यांच्या चढाया व विनायक मोरेच्या भक्कम बचावाला याचे श्रेय जाते. जयदीप चौधरी, केतन मलिक यांचा चतुरस्त्र खेळ माझगाव डॉकचा पराभव टाळण्यासा कुठे तरी कमी पडला. पश्र्चिम रेल्वेने बँक ऑफ इंडियाला ३५-२४असे पराभूत करीत ड गटातून उपविजेते म्हणून बाद फेरी गाठली. देना बॅँकेकडून निसटता पराभव पत्करावा लागल्यामुळे रेल्वेसाठी हा सामना “करो या मरो” असाच होता.
पहिल्या डावात अक्षय सोनी, लक्ष्मण दोलतोडे यांच्या चढाई पकडीच्या जोरावर बँकेला १५-१२अशी आघाडी मिळवून दिली होती. पण दुसऱ्या डावात रेल्वेच्या सुनील जयपाल, चेतन थोरात, रवी कुमार यांनी झंजावती खेळ करीत रेल्वेच्या झोकीत विजयाचे दान टाकले.
५५किलो वजनी गटात विजय क्लबने सिद्धी प्रभाला ४८-१४असे सहज नमविले. आझाद केवट,दुर्गेश भागवत यांच्या तुफानी खेळाला या विजयाचे श्रेय जाते. सिद्धी प्रभाचा आकाश मोरे बरा खेळला. अशोक मंडळाने साईराजला ५२-१५असे धुऊन काढले.
मध्यांतराला ३१-०८अशी आघाडी घेणाऱ्या अशोकाने साईराजवर ५लोण चढविले. ओमकार कामतेकर, सुरज सुतार, शुभम आंग्रे या विजयाचे शिल्पकार ठरले. जय दत्तगुरुने दीपेश चव्हाणच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर श्रीगणेशाला ४७-४०असे नमविले.
मध्यांतराला २९-१३ अशी आघाडी घेणाऱ्या दत्तगुरुला नंतर मात्र कडव्या प्रतिकाराला तोंड द्यावे लागले. श्रीगणेशाच्या तेजस शिंदेने जोरदार कमबॅक करीत आपल्या संघाला भराभर गुण मिळवून दिले,पण त्याला अन्य सहकाऱ्याची योग्य ती साथ न लाभल्या ने पराभव पत्करावा लागला. विजय बजरंग व्यायाम शाळेने बंड्या मारुतीला ५४-२२, शिवशक्तीने डॉ आंबेडकरचा ५०-३७, वारसलेनने जय भारतला ५३-४६ असे पराभूत केले. या गटातील सर्व विजयी संघांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली.