दुबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ मधील ३३ वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात मंगळवारी (२२ सप्टेंबर) रोजी खेळवण्यात आला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीने ८ विकेट्सने विजय मिळवला. यासह स्पर्धेतील ७ वा विजय मिळवत गुणतालिकेत पहिला क्रमांक मिळवला.
हैदराबादने दिल्लीला १३५ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग दिल्लीने १७.५ षटकांत २ विकेट्स गमावत पूर्ण केला. दिल्लीकडून माजी कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक नाबाद ४७ धावा केल्या. तर शिखर धवनने ४२ धावा केल्या. याशिवाय कर्णधार रिषभ पंतने नाबाद ३५ धावांची खेळी केली. हैदराबादकडून खलील अहमद आणि राशिद खान यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
दिल्लीच्या फलंदाजांचा बोलबाला
दिल्लीकडून शिखर धवन आणि पृथ्वी शॉ सलामीला फलंदाजीसाठी मैदानात उतरले होते. पण, शॉ फार मोठी खेळी करु शकला नाही. डावाच्या तिसऱ्या षटकात त्याला ११ धावांवर खलील अहमदने बाद केले. शॉ याचा अप्रतिम झेल विलियम्सनने घेतला. पण त्यानंतर शिखर आणि श्रेयस अय्यरने हैदराबादला मोठे यश मिळू न देता अर्धशतकी भागीदारी रचली.
मात्र, त्या दोघांची भागीदारी रंगत असतानाच शिखरला राशिद खानने ११ व्या षटकात बाद केले. शिखरने ३७ चेंडूत ४२ धावा केल्या. या खेळीत त्याने ६ चौकार आणि १ षटकार मारला. शिखर आणि श्रेयस अय्यर यांच्यात ५२ धावांची भागीदारी झाली. शिखर बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत आणखी पडझड न होऊ देता दिल्लीला विजयापर्यंत पोहचवले. या दोघांनी नाबाद ६७ धावांची भागीदारी केली.
श्रेयसने ४१ चेंडूत नाबाद ४७ धावा केल्या. या खेळीत त्याने २ चौकार आणि २ षटकार मारले. तर पंतने २१ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकांरांसह नाबाद ३५ धावा केल्या.
दिल्लीच्या गोलंदाजांची चमकदार कामगिरी
या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ बाद १३४ धावा केल्या. हैदराबादकडून अब्दुल सामदने सर्वाधिक २८ धावा केल्या. त्याचबरोबर राशिद खानने २२ धावांची खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त कोणालाही २० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. दिल्लीकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच एन्रीच नॉर्किए आणि अक्षर पटेलने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
दिल्लीचा डाव १३४ धावांवर संपुष्टात
या सामन्यात हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हैदराबादच्या फलंदाजीची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. त्यांच्याकडून सलामीला डेव्हिड वॉर्नर आणि वृद्धिमान सहा फलंदाजीसाठी उतरले. मात्र, वॉर्नरला पहिल्याच षटकात शून्यावर एन्रीच नॉर्किएने बाद केले. त्यानंतर सहाने कर्णधार केन विलियम्सनसह डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण सहाला कागिसो रबाडाने ५ व्या षटकात १८ धावांवर शिखर धवनकडे झेल देण्यास भाग पाडले.
त्यानंतर विलियम्सनला मनिष पांडेने चांगली साथ दिली होती. या दोघांनी ३१ धावांची भागीदारी केली. पण १० व्या षटकात अक्षर पटेलने विलियम्सनला १८ धावांवर आणि ११ व्या षटकात मनिषला १७ धावांवर कागिसो रबाडाने बाद केले. १३ व्या षटकात नॉर्किएने केदारला केवळ ३ धावांवर बाद केले. त्यामुळे हैदराबादचा अर्धा संघ तंबुत परतला.
त्यानंतरही फारसा कोणाला प्रभाव पाडता आला नाही. १६ व्या षटकात जेसन होल्डर अक्षर पटेलच्या फिरकीत अडकला आणि १० धावा करुन पृथ्वी शॉकडे झेल देऊन बाद झाला. पाठोपाठ १९ व्या षटकात रबाडाने २१ चेंडूत २८ धावा करणाऱ्या युवा अब्दुल सामदला माघारी धाडले. तर अखेरच्या षटकात राशिद खान १९ चेंडूत २२ धावा करुन धावबाद झाला. अखेरच्या चेंडूवर संदीप शर्माही धावबाद झाला. त्यामुळे हैदराबादने ९ बाद १३४ धावा केल्या.
असे आहेत ११ जणांचे संघ
या सामन्याच्या काही तासांपूर्वी बातमी आली होती की हैदराबाद संघाचा गोलंदाज टी नटराजन याचा कोविड-१९ चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तो आयसोलेशनमध्ये आहे. तसेच त्याच्या संपर्कात आलेल्या ६ सदस्यांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. यात विजय शंकरचाही समावेश आहे. पण असे असले तरी या सहाही जणांचा तसेच अन्य संघातील सदस्यांचा कोविड-१९ चाचणी अहवाल निगेटीव्ह आला आहे, त्यामुळे हा सामना खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या सामन्यासाठी हैदराबादच्या अंतिम ११ जणांच्या संघात कर्णधार केन विलियम्सनसह जेसन होल्डर, राशिद खान आणि डेव्हिड वॉर्नर या चार परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. वॉर्नरचे संघात पुनरागमन झाले आहे. याशिवाय वृद्धिमान सहा सलामीला फलंदाजीला उतरेल. तसेच केदार जाधव, खलील अहमद, भुवनेश्वर कुमार या भारतीय खेळाडूंनाही संघात स्थान मिळाले आहे.
दिल्लीने अंतिम ११ जणांच्या संघात आर अश्विनला संधी मिळाली असून एन्रीच नॉर्किए, कागिसो रबाडा, मार्कस स्टॉयनिस आणि हेटमायर या परदेशी खेळाडूंना निवडण्यात आले आहे. त्याचबरोबर श्रेयस अय्यरचे संघात पुनरागमन झाले आहे.
असे आहेत ११ जणांचे संघ –
सनरायझर्स हैदराबाद: डेव्हिड वॉर्नर, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), केन विलियम्सन (कर्णधार), मनीष पांडे, जेसन होल्डर, अब्दुल समद, केदार जाधव, रशिद खान, भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा, खलील अहमद.
दिल्ली कॅपिटल्स: पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), मार्कस स्टॉयनिस, शिमरॉन हेटमायर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कागिसो रबाडा, एन्रीच नॉर्किए, अवेश खान.