इंडियन प्रीमियर लीग २०२६ च्या हंगामासाठी झालेल्या लिलावामध्ये कोलकाता नाईट रायडर्सने ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमेरुन ग्रीन याला विक्रमी २५.२० कोटी रुपयांना खरेदी केले होते. कोलकाताने त्याला आंद्रे रसेलची रिप्लेसमेंट म्हणून संघात सामील केले. रसेलही अष्टपैलू होता. ग्रीनची सध्याची कामगिरी चिंताजनक होत आहे, तसेच तो दुखापतीतून सावरत मैदानावर परतणार आहे. त्यामुळे तो कोलकातासाठी किती षटके गोलंदाजी करणार हा? प्रश्न उपस्थित झाला आहे.
ग्रीनला पाठीची गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर तो सुधारला असून त्याने गोलंदाजी मात्र खूप कमी केली आहे. आता आयपीएलमध्ये त्याचा भाव पाहता त्याच्याकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. अशातच तो कोलकातासाठी रसेलप्रमाणे गोलंदाजी आणि फलंदाजी करतो का याकडे लक्ष असेल.
ग्रीन आयपीएलमध्ये गोलंदाजी करणार की नाही? किंवा केली तर तो किती षटके टाकणार? याबाबत महत्वाचा सल्ला भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनने दिला आहे. त्याने त्याच्या युट्युब चॅनलवरील ‘ऐश की बात’ यामध्ये वरिष्ठ क्रिडा पत्रकार विमल कुमार यांच्याशी चर्चा करताना ग्रीनबाबच्या गोलंदाजीचा उल्लेख केला आहे.
अश्विन म्हणाला, “कॅमेरुन ग्रीनबद्दल माझा एक प्रश्न आहे क्रिकेट ऑस्ट्रेलिया त्याला आयपीएलच्या प्रत्येक सामन्यात चार षटके गोलंदाजी करण्याची परवाणगी देणार का क्रिकेट ऑस्ट्रेलिया सरळ-सरळ म्हणू शकते तुम्ही चार षटके गोलंदाजी नाही करू शकत त्यामुळे पुढे काय होते यासाठी आपल्याला प्रतिक्षा करावी लागेल.”
“क्रिकेट ऑस्ट्रेलिया म्हणतो की तुम्ही आयपीएलमध्ये खेळा, मात्र आमच्यासाठी कसोटी क्रिकेट सर्वात महत्वाचे आहे. ग्रीनचा त्यांच्यासोबत केंद्रीय करार आहे. तसेच आयपीएलच्या संघांनाही अशी संधी मिळायला हवी, ज्यामध्ये तुम्ही केवळ २ षटके टाकणार असाल तर तुमच्या करारामधून २ कोटी रुपये कापले जातील. जर तो ४ षटके गोलंदाजी करत नसेल, तर संघांना पैसे कापण्याचा अधिकार आहे,” असेही अश्विनने पुढे म्हटले आहे.
यावेळी अश्विनने फ्रॅंचायजीच्या मालकांचे उदाहरण देत म्हटले, “समजा, तुम्ही केकेआरचे आणि शाहरुख खान आहात. तुम्ही एका खेळाडूसाठी २५ कोटी रुपये मोजले आणि तो खेळाडू म्हणतो मी केवळ एकच षटक टाकणार तर तुम्हाला कसे वाटेल? जेव्हा तुम्ही लिलावामध्ये सहभागी झाला होता, तेव्हा तुमच्याकडून चार षटके गोलंदाजी करण्याची अपेक्षा होती. त्यावर काही बंदी असेल तर संघाला पैसे कापण्याचा अधिकार असावा.”
अश्विनचा हा पूर्ण रोख क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे आहे. ते त्यांच्या खेळाडूंचे वर्कलोड सांभाळत असल्याने बहुतेक खेळाडू आयपीएलच्या सुरूवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहेत. यामध्ये मिचेल स्टार्कचा समावेश आहे. तसेच जोश हेझलवूड, पॅट कमिन्स हे पण दुखापतग्रस्त आहेत. त्यामुळे ते एप्रिलमध्ये संघाशी जोडले जाणार आहेत.






