भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चहर आणि यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेत सहभागी झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला रवाना झाले आहेत. भारत-अ संघ तीन चारदिवसीय कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. हे दोन्ही खेळाडू भारत-अ संघात सामील होतील. कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील शेवटच्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात दोघेही भारतीय संघाचा भाग होते. या प्रवासा दरम्यान दोघेही अभिनेता कपिल शर्मा आणि जॉन अब्राहमला या दोन दिग्गज कलाकारांना भेटले.
कपिल शर्माने ईशान आणि दीपकसोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिघांनीही मास्क घातले आहेत. कपिलने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मित्रांनो काही अंदाज लावता येईल का? या फोटोत माझ्यासोबत कोण-कोण आहे ते?’ कपिलच्या या कॅप्शनवर चाहत्यांनी भरभरून उत्तरे दिली आहेत. मास्क घातलेल्या ईशान आणि दीपकला चाहत्यांनी सहज ओळखले. कपिलच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.
त्याचवेळी दीपक चहरने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये कपिल शर्मा आणि जॉन दोघेही त्याच्यासोबत दिसत आहेत. हा फोटो शेअर करत दीपकने लिहिले की, ‘जॉन भाई आणि कपिल पाजी तुम्हा दोघांना भेटून खूप छान वाटले. आता पुढच्या प्रवासासाठी. दक्षिण आफ्रिकेच्या प्रवासाठी माझे सहप्रवासी. दिपकच्याही या पोस्टवर चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दीपक चहर टी२० प्रकारामध्ये खेळत असला तरी त्याला अद्याप कसोटी क्रिकेटमध्ये संधी मिळालेली नाही. दीपकने गेल्या काही दिवसांत गोलंदाजी आणि फलंदाजीत बरीच सुधारणा केली आहे. अशा परिस्थितीत संघ व्यवस्थापन त्याची गोलंदाजी आणखी सुधारण्यात गुंतले आहे. त्याचबरोबर ईशान किशननेही आपल्या फलंदाजीने खूप प्रभावित केले आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यात ईशानने सलामीला येत वेगवान २१ चेंडूत २९ धावा केल्या. पहिल्या दोन सामन्यात त्याला संधी मिळाली नव्हती.