शनिवारी (१२ फेब्रुवारी) आणि रविवारी (१३ फेब्रुवारी) इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामचा लिलाव (IPL 2022 Auction) पार पडला. बंगळुरु येथे पार पडलेल्या या लिलावात अनेक स्टार खेळाडूंना कोट्यावधी रुपयांची बोली लागली. लिलावात एकूण ११ खेळाडूंना १० कोटींहून अधिक रकमेची बोली लागल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये वेगवान गोलंदाज दीपक चाहर (Deepak Chahar) याचेही नाव आहे.
सीएसकेची दीपकसाठी मोठी बोली
आयपीएल लिलावावेळी दीपकसाठी अनेक संघांमध्ये चूरस पाहायला मिळाली होती. पण, या संघांमध्ये चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघ सर्वांनाच चांगली टक्कर देत होता. अखेर सीएसकेनेच (CSK) दीपकसाठी १४ कोटींची सर्वाधिक बोली लावत आपल्या संघात पुन्हा सामील करून घेतले. दीपक याआधीही २०१८ पासून सीएसके संघाचा भाग होता.
दीपक आयपीएल २०२२ लिलावातील सर्वात महागडा ठरलेला दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याच्यापूर्वी इशान किशनला १५.२५ कोटी रुपयांची बोली मुंबई इंडियन्सने लावली होती.
सीएसके बोली लावेल, याचा विश्वास होता – दीपक चाहर
सीएसकेने लिलावापूर्वी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याला १२ कोटी रुपयांमध्ये संघात कायम केले आहे. तर, आता दीपकला सीएसकेने १४ कोटी रुपयात खरेदी केले आहे. याबद्दल जेव्हा मोहम्मद कैफ याने (Mohammad Kaif) दीपकला प्रश्न विचारला असता, त्याने यावर शानदार उत्तर दिले आहे.
आयपीएल २०२२ लिलावाच्या स्टार स्पोर्ट्सच्या लाईव्ह शोमध्ये दीपक चहरला प्रश्न विचारण्यात आला की, सीएसकेने त्याच्यावर जो विश्वास दाखवला, त्याची तुला अपेक्षा होती का? त्यावर उत्तर देताना दीपक म्हणाला, ‘मला अपेक्षा तर होती की, चेन्नई मला पुन्हा खरेदी करण्याचा प्रयत्न करेल. पण हे माहीत नव्हते की ते इतक्या वरपर्यंत जातील. कारण, लिलावात प्रत्येक फ्रँचायझीला अनेक गोष्टी पाहायच्या असतात.’
त्याचबरोबर या शोमध्ये कैफने दीपकला विचारले की, धोनीला १२ कोटी आणि त्याला १४ कोटी, या गोष्टीकडे कसा पाहातो, त्यावर दीपकने आपली प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, ‘माही भाईच्या हातात असते, तर त्याने एकही रुपया घेतला नसता. तो संघ बनवण्याचा विचार करतो. तो कधीच असा विचार करत नाही की, मला १४ कोटी आणि त्याला १२ कोटी. आता प्रश्न आहे तो जबाबदारीचा, तर मी तेच करेल, जे मी संघासाठी करत आलो आहे. हे जरुरीचे नाही की मी प्रत्येक सामना जिंकवून देईलच, पण मी प्रयत्न करेल की, प्रत्येक सामन्यात संघासाठी मी महत्त्वाचे योगदान देईल.’
दीपक चाहरची आयपीएल कारकिर्द
दीपक चाहरने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत ६३ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २९.१८ च्या सरासरीने ५९ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने २ वेळा चार किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. १३ धावांत ४ विकेट्स ही त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL Auction: गुजरात टायटन्सने तब्बल ३.२ कोटींची बोली लावलेला कोण आहे यश दयाल?