इंडियन प्रीमीयर लीग २०२१ ची सुरुवात शुक्रवार दिनांक ९ एप्रिलला झाली. अनेकदा खेळाडूंनी आयपीएलच्या काळात केलेले विक्रम तोंडात बोटे घालायला लावतात. अशीच एक विक्रमी खेळी पंजाब किंग्स संघाकडून खेळताना दीपक हुडाने केली. सोमवारी (१२ एप्रिल) आयपीएल २०२१ हंगामातील चौथा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात झाला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्स संघाकडून खेळताना दीपक हुडाने २० चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याने या सामन्यात एकूण २८ चेंडूत ६४ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ४ चौकार आणि ६ षटकार मारले. तसेच त्याच्यासह पंजाबचा कर्णधार केएल राहुलने ९१ धावांची खेळी केली. त्यामुळे पंजाबने प्रथम फलंदाजी करताना २२१ धावांचा डोंगर उभा केला होता.
६ वर्षांपूर्वीही केली होती अशीच खेळी
बरोबर ६ वर्षांपूर्वी १२ एप्रिल २०१५ रोजी हुडाने २२ चेंडूत अर्धशतकी खेळी करण्याचा पराक्रम केला होता. विशेष म्हणजे त्यावेळी त्याने हे वादळी अर्धशतक राजस्थान रॉयल्स संघासाठी केले होते. म्हणजेच सोमवारी ज्या संघाविरुद्ध हुडाने अर्धशतक केले, त्याच संघासाठी ६ वर्षांपूर्वी त्याने तशीच वादळी खेळी केली होती.
सोमवारी हुडाने केलेली आक्रमक खेळी महत्त्वपूर्ण ठरली. कारण अखेरच्या चेंडूपर्यंत चाललेल्या या सामन्यात पंजाबने केवळ ४ धावांनी विजय मिळवला.
राजस्थानचा पराभव
सोमवारी पंजाब किंग्सविरुद्ध २२२ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या राजस्थानला २० षटकांत ७ बाद २१७ धावा करता आल्या. अखेरच्या चेंडूवर राजस्थानला विजयासाठी ५ धावांची गरज होती. त्यावेळी शतकी खेळी करणारा राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन षटकार मारण्याच्या नादात बाद झाला आणि हा सामना पंजाबने जिंकला. सॅमसनने ६३ चेंडूत ११९ धावा करताना १२ चौकार आणि ७ षटकार मारले.
त्याच्याव्यतिरिक्त राजस्थानचा अन्य कोणताही फलंदाज ३० धावांचा टप्पा पार करु शकला नाही. जॉस बटलर(२५), शिवम दुबे (२३) आणि रियान पराग (२५) यांनी छोटेखानी आक्रमक खेळी केल्या. मात्र, यातील कोणाही सॅमसनला अधिक काळ साथ देऊ शकले नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या –
‘युनिवर्स बॉस’ ख्रिस गेलच आहे आयपीएलमधील ‘षटकार किंग’, हा विक्रम पाहून विश्वास बसेल.
पंजाबला घाम फोडणारी शतकी खेळी करणाऱ्या संजू सॅमसनने केला मोठा रेकॉर्ड, बनला पहिलाच कर्णधार






