भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ घोषित केला आहे. विराट कोहली, रोहित शर्मासह अनेक खेळाडू सध्या इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे बीसीसीआयने अनेक युवा व प्रतिभाशाली खेळाडूना श्रीलंका दौऱ्यावर संधी दिली आहे. तर काही खेळाडूंचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. त्यातील एक नाव म्हणजे वेगवान गोलंदाज दीपक चाहर याचे. या संघाचे नेतृत्व शिखर धवन करणार आहे व उपकर्णधार म्हणून वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला नेमण्यात आले आहे.
सध्या संपूर्ण भारतीय संघ हा श्रीलंका दौऱ्याअगोदर मुंबईमधील एका हॉटेलमध्ये विलगीकरणामध्ये आहे. यादरम्यान अनेक खेळाडू विलगीकरणात सराव करतानाचे व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करताना दिसत आहे. असाच एक व्हिडिओ वेगवान गोलंदाज दीपक चाहरने शेयर केला आहे.
दीपक चाहरने इन्स्टाग्रामवर आपला व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो हॉटेलमध्ये फलंदाजीचा सराव करताना दिसतो. तो टेनिस बॉलने क्रिकेट खेळताना दिसत आहे. यावेळी त्याने बेसबॉलची बॅट घेऊन फलंदाजी केली आहे. या व्हिडिओमध्ये नवदीप सैनी त्याला गोलंदाजी करत आहे. तर चेतन सकारिया क्षेत्ररक्षण करताना दिसत आहे.
चाहरने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “हे पाहून मला माझ्या शाळेच्या दिवसांची आठवण झाली. अजून कोणाकोणाला असे वाटले.”
https://www.instagram.com/reel/CQgdkjphFc4/?utm_source=ig_web_button_share_sheet
हे तीन क्रिकेटपटू श्रीलंकेला जाणाऱ्या इतर खेळाडूंसह मुंबईतील हॉटेलमध्ये १४ दिवस विलगीकरणामध्ये राहणार आहेत. येथून संघ थेट कोलंबोला रवाना होईल. भारत श्रीलंकेविरुद्ध १३ जुलैपासून तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. यानंतर त्यांना तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. यावेळी कृष्णाप्पा गौतम, चेतन सकारिया, देवदत्त पड्डीकल, ऋतुराज गायकवाड आणि नितीश राणा या नव्या खेळाडूंना भारतीय संघात स्थान मिळाले आहे.
महत्वाच्या बातम्या
एक पराभव अन् कोहलीवर टीकांचा वर्षाव, पण त्याची ‘ही’ कामगिरी भल्याभल्याची बोलती करेल बंद
ऐतिहासिक कसोटीतील पराभवानंतर बीसीसीआयचा मोठा निर्णय, इंग्लंड-श्रीलंकेला जाणार संघ निवडकर्ते!
अजिंक्यच्या कसोटी संघातील स्थानावर टांगती तलवार, ‘हे’ ३ खेळाडू घेऊ शकतात जागा