काल विश्वचषकातील चौथ्या सामन्यात भारताने श्रीलंका संघावर १६ धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीच्या दिशेने भक्कम वाटचाल सुरु केली आहे. भारताचा हा ४ सामन्यातील सलग ४था विजय होता.
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी कारण्याचा निर्णय घेतला. परंतु भारतीय सलामीवीर पूनम राऊत आणि स्म्रिती मंधाना यांना विशेष चमक दाखवता आली नाही आणि दोघीही अनुक्रमे १६ आणि ८ धावांवर बाद झाल्या.
त्यांनतर फलंदाजीला आलेल्या दीप्ती शर्मा आणि मिताली राज यांनी मोठी भागीदारी करत वयैक्तिक अर्धशतके झळकावली. परंतु संघाला एक मोठी धावसंख्या उभारून देण्यात त्या अपयशी ठरल्या.
हरमनप्रीत कौर (२०) आणि वेदा कृष्णमुर्ती (२९) यांच्यामुळे भारताला दोनशेच्या पलीकडे मजल मारण्यात यश आले. श्रीलंकेच्या श्रीपाल वीराकोडीने ३ आणि इनोका रणवीराने २ बळी घेत भारतीय फलंदाजीला रोखले. तळातील फलंदाज नियमित अंतराने बाद होत गेले आणि भारतीय संघाने ५० षटकांत ८ विकेट्सच्या मोबदल्यात २३२ धावा केल्या.
२३३ धावांच लक्ष घेऊन मैदानात आलेल्या श्रीलंका संघाला ५० षटकांत २१६ धावांपर्यंत मजल मारता आली. श्रीलंकेच्या आघाडीच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी करून आव्हान राखण्याचा प्रयत्न केला परंतु नियमित अंतराने विकेट्स पडत गेल्यामुळे श्रीलंका संघ पराभूत झाला.
दिलानी मनोदरा (६१), शशिकला सिरिवर्देने (३७) आणि निपुनी हंसिका (२९) यांनी श्रीलंकेकडून सर्वोच्च धावा केल्या. भारताकडून अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामी (२), पुनम यादव(२), दीप्ती शर्मा (१) आणि एकता बिस्त (१) यांनी बळी घेत भारताला विजय मिळवून दिला.
संक्षिप्त धावफलक :
भारत : ५० षटकात ८ बाद २३२ धावा (दीप्ती शर्मा ७८, मिताली राज ५३, वेदा कृष्णमुर्ती २९; श्रीपाल वीराकोडी ३/२८, इनोका रणवीरा २/५५).
श्रीलंका : ५० षटकात ७ बाद २१६ धावा (दिलानी मनोदरा ६१, शशिकला सिरिवर्दने ३७, निपुनी हंसिका २९; पुनम यादव २/२३, झुलन गोस्वामी २/२६, दीप्ती शर्मा १/४६.)
PC: espncricinfo.com