इंग्लंडमध्ये खेळल्या जात असलेल्या ‘द हंड्रेड’ स्पर्धेत भारतीय महिला खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. मंगळवार रोजी (10 ऑगस्ट) सामनावीर दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीमुळे लंडन स्पिरिटने मँचेस्टर ओरिजिनल्सचा 5 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना मँचेस्टर ओरिजिनल्सने 100 चेंडूत 5 खेळाडू गमावून 127 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात लंडन स्पिरीटने 98 चेंडूतच 5 गडी गमावून त्यांचे लक्ष्य साध्य केले. दरम्यान दिप्तीने गोलंदाजीसह फलंदाजीतही योगदान देत संघाला विजय मिळवून दिला.
दीप्तीने सुरुवातीला गोलंदाजीत प्रशंसनीय प्रदर्शन केले. 20 चेंडूत 10 धावा देऊन 2 बळी घेतले आणि 11 निर्धाव चेंडूही टाकले. यानंतर, दीप्तीने फलंदाजीतही हातभार लावत संघाला दोन चेंडू बाकी असताना विजय मिळवून दिला. तिने 23 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने नाबाद 34 धावांची खेळी केली.
असा झाला सामना
मँचेस्टर ओरिजिनल्सची कर्णधार केट क्रॉसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एम्मा लॅम्ब आणि लिझेल ली या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी 30 धावांची भागीदारी केली. मात्र, या भागीदारीतील सर्व धावा लॅम्बने केल्या आणि लिझेल ली खाते न उघडता दीप्तीच्या चेंडूवर पायचित झाली. त्याचबरोबर एम्मा लॅम्बने 30 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 39 धावांची खेळी खेळली. तिच्याशिवाय मिग्नॉन डु प्रीझने 27 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 31 धावा केल्या. शेवटच्या क्षणांमध्ये, सोफी एक्लेस्टोनने 26 चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 32 धावा करून संघाला 127 च्या धावांवर नेले.
मँचेस्टर ओरिजिनल्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लंडन स्पिरिटला चांगली सुरुवात भेटली नाही. सलामीवीर टॅमी ब्यूमोंट खाते न उघडता बाद झाला. नाओमी दत्तानी देखील फक्त 11 धावा करू शकली. यानंतर, कर्णधार हिथर नाइट आणि डिंड्रा डॉटिन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी करत संघाची जबाबदारी सांभाळली. हिथर नाइटने 26 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 35 धावा आणि डॉटिनने 23 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 28 धावा केल्या.
मात्र, 87 च्या धावसंख्येवर पाच विकेट गमावल्यानंतर लंडनचा संघ अडचणीत सापडला. संघाला 30 चेंडूत 41 धावांची गरज होती. मात्र, दीप्ती शर्मा आणि शार्लोट डीन (नाबाद 12) यांनी संघाला विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
चेन्नई पाठोपाठ मुंबईही ‘या’ दिवशी युएईला होणार रवाना, पहिल्याच सामन्यात असतील आमने सामने
“लॉर्ड्स कसोटी जिंकल्यास भारत टेस्ट सीरिजमध्ये इंग्लंडला व्हाईटवॉश करेल”
इंग्लंडला जबर धक्का! स्टुअर्ट ब्रॉड भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर, कारण घ्या जाणून