आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (WTC final 2025) सामना इंग्लंडच्या लॉर्ड्समध्ये ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका (SA vs AUS) यांच्यात खेळला गेला. चार दिवसात हा सामना संपला, ज्यामध्ये साउथ आफ्रिका संघाने ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव करत त्यांना 5 विकेट्सने पराभूत केले आणि 27 वर्षानंतर ट्रॉफीवर त्यांचे नाव कोरले. ऑस्ट्रेलियाला 15 वर्षानंतर आयसीसी फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. तसेच फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया संघाची फलंदाजी काही खास राहिली नाही, तसेच आता कर्णधार कमिन्सने संघातील मोठ्या बदलांचे संकेत दिलेले आहेत.
पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) नेतृत्वात ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदा आयसीसी फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. त्यानंतर आता कसोटी संघात मोठा बदल पाहायला मिळू शकतो. वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलियाची पुढची मालिका आयसीसी विश्व टेस्ट चॅम्पियनशिप 2025- 27 चक्राचा भाग असणार आहे आणि नव्या सुरुवाती सोबत कसोटीमध्ये बदल होऊ शकतात.
डब्ल्यूटीसी फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर प्रेस कॉन्फरन्समध्ये कर्णधार कमिन्सने म्हटले, हे एक नव्या सुरुवातीसारखे वाटत आहे. आम्हाला वाटत आहे की, आता बदल करण्याची योग्य वेळ आलेली आहे किंवा तुम्ही त्या संघासोबत आहात ज्याने तुम्हाला फायनल पर्यंत पोहोचवले. मला वाटते की वेस्टइंडीज सोबत मालिकेआधी आमच्याकडे काही आठवडे आहेत. त्यामुळे हा पराभव पत्करून आम्ही पुढच्या मालिकेसाठी योग्य तो निर्णय घेऊ.
त्याने पुढे बोलताना म्हटले, पहिल्या दिवशी टॉस हारणे आणि फलंदाजीसाठी जाणं टॉप 3 साठी कधीच सोपं नसतं, पण मला वाटते की आमच्या संघात असे काही खेळाडू होते जे आणखीन चांगली कामगिरी करू शकत होते.